(नवी दिल्ली)
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची देशाच्या नव्या अटर्नी जनरलपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती पुढच्या तीन वर्षांसाठी करण्यात आलेली आहे.
वर्तमान अॅटर्नी जनरल केके वेणुगोपालयांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. या आधी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांचे नाव अॅटर्नी जनरल पदासाठी चर्चेत होतं. पण त्यांनी केंद्र सरकारची ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर आता आर व्यंकटरमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ७६ अन्वये देशाच्या अॅटर्नी जनरल पदाची नियुक्ती करण्यात येते. अॅटर्नी जनरल भारत सरकारची कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. केंद्र सरकारची न्यायालयात बाजू मांडणे तसेच विविध विषयांवर केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देणं हे अॅटर्नी जनरल यांचे मुख्य काम असतं.
अॅटर्नी जनरल यांना संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. तसचे ते संसदेच्या संयुक्त बैठकीत आणि संसदीय समितीच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. पण खासदारांप्रमाणे त्यांना मतदानाचा अधिकार मात्र नसतो