( देवरुख )
२०१४ मध्ये मोदीजींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन लोकांनी मतदान केले. आणि दिमाखदार विजय संपादन करत भारतीय जनता पक्षाने केंद्रात आपले सरकार स्थापन केले. २०१९ साली याचीच पुनरावृत्ती झाली. ५ वर्षांच्या मोदीजींच्या कामकाजाची पोचपावती म्हणून जनता पुन्हा एकदा सरसावली आणि भाजपा पुन्हा एकदा बहुमताने केंद्रीय सत्तेत आली. आता सरकारच्या एकंदर ९ वर्षांच्या लोककल्याणकारी कारकीर्दीचा अहवाल लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ‘मोदी ॲट ९’ या अभिनव अभियानांतर्गत अनेक उपक्रम पुढील महिनाभर देशभर राबवण्यात येणार आहेत. याबाबत नियोजन करण्यासाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजन बैठक आज देवरुख येथील भाजपा कार्यालयात संपन्न झाली.
या अभियानाचे विधानसभा संयोजक प्रमोद अधटराव यांनी प्रस्तावना करून या अभियानाची आवश्यकता आणि अपेक्षित फलनिष्पत्ती याबाबत मार्गदर्शन केले. रत्नागिरी (द.) जिल्हा प्रभारी प्रमोद जठार यांनी या अभियानात सहभागी कार्यकर्त्यांकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी अभियानांतर्गत विविध जबाबदाऱ्यांचे निर्वहन करताना कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने कार्य करण्याचा सल्ला दिला. प्रत्येक जबाबदारी पूर्ण करताना लोकसहभाग जास्तीतजास्त होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिला मोर्चाची भूमिका या अभियानात महत्त्वाची आहे. तर युवा मोर्चा आणि सोशल मिडिया यांनीही पुढील काही महिने झोकून काम करणे पक्षाच्या आणि पर्यायाने लोकांच्या हिताचे ठरणार आहे. अध्यक्षीय मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी कार्यकर्त्यांनी सजगपणे काम करण्याचा सल्ला दिला. आपले नेते मा. मोदीजी आपला संपूर्ण वेळ सेवाकार्यात व्यतीत करत असतात तर आपण दिवसाचे केवळ २ तास तरी काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. हे काम गुणात्मक असावे ज्यामुळे अपेक्षित फलनिष्पत्ती आपल्याला प्राप्त होऊ शकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यानंतर संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील विशाल शिळकर व आंबेड बु. येथील मयुरेश मादुस्कर या युवा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर म्हणाले की, पक्ष प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देतो. मिळालेल्या संधीचा लाभ घेत सुवर्णकामगिरी करणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कार्य केल्यास २०२४ साली रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ चिन्ह हाती घेणारा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल आणि खऱ्या अर्थाने जनतेला आपल्या सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देता येईल. प्रश्नोत्तरे आणि शंकानिरसन झाल्यानंतर बैठकीचा समारोप करण्यात आला.