( खेड )
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सुपरफास्ट मंगला एक्स्प्रेसच्या इंजिन बिघाडानंतर विस्कळीत झालेले वेळापत्रक सोमवारीही कायमच होते. दुसऱ्या दिवशीही निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे उशिरानेच धावली. अन्य तीन गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होवून प्रवाशांना रखडपट्टीला सामोरे जावे लागले.
१२६१७ क्रमांकाची एर्नाकुलम – निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये रविवारी सुट्टीच्याच दिवशी झालेल्या बिघाडाने २ तास वाहतूक ठप्प होवून प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. या इंजिन बिघाडाचा ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होवून प्रवाशांच्या पदरी विलंबाचा प्रवास पडला होता. सोमवारीही १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
यापाठोपाठ सीएसएमटी मुंबई- मांडवी एक्स्प्रेस, दिवा -सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी- दिवा पॅसेंजर या तीन गाड्याही ४० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाल्या. विस्कळीत वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत.