(रत्नागिरी)
तालुक्यातील जाकादेवी येथे दारुच्या नशेत विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या वकिलावर आता अटकेची टांगती तलवार आहे. नुकताच सत्र न्यायालयाने संशयित आरोपी वकिलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे वकिलाला आता कोणत्याही क्षणी ग्रामीण पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रवींद्र केशव लेंडे (३१, रा. पॉवरहाऊस चाफे रत्नागिरी) असे या वकिलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित महिला ही मुळ उत्तरप्रदेशमधील असून ती आपल्या कुटुंबासह जाकादेवी येथे वास्तव्यास आहे. पीडिता व तिचा पती जाकादेवी येथे मोलमजुरीचे काम करतात. २१ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पीडिता ही गोठ्याची साफसफाई करत असताना संशयित रवींद्र लेंडे दारुच्या नशेत तिथे आला. त्याने पीडितेचा हात पकडून तू माझ्यासोबत खोलीत चल, असे म्हणाला. पीडितेने माझ्या पतीला तसेच मालकांना सांगेन, असे म्हणाली. यावेळी आरोपीने तिला शिवीगाळ करत पायातील चप्पल काढून पीडितेच्या थोबाडीत मारली.
पुन्हा तिचा उजवा हात पकडून ओढून नेण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार पीडित महिलेने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती. पीडितने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित रवींद्र लेंडेविरोधात भादंवि कलम ३५४, ३५४(अ), ३२३, ५०४,५ ०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांकडून आपल्याला अटक होईल, या भीतीने रवींद्र लेंडेने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ५ रोजी न्यायालयापुढे सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने लेंडे याचा अटकपूर्व अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आता वकील लेंडेला अटक होण्याची शक्यता आहे.