(दापोली)
तालुक्यातील भोमडी फुगीची नदी येथे ७ गावठी जिवंत बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नदीलगतच्या जंगलमय भागात जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे ७ बॉम्ब पेरून ठेवण्यात आले होते. ही घटना ५ डिसेंबर रोजी उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीनंतर पथकाने सात बॉम्ब ताब्यात घेतले असून, त्याची किंमत सात हजर रुपये एवढी आहे.
भोमडी परिसरात गावठी बॉम्ब पेरून ठेवल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात दापोली पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी पालगड कोर्टी वाडी येथे याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरून ग्रामीण भागात शिकारीसाठी गावठी बॉम्ब वापरले जात असल्याचे चर्चा असून, याचे कनेक्शन नेमके कुठे आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
गावठी बॉम्ब पेरणाऱ्या व्यक्तीसह या परिसरात शिकारीचे रॅकेट आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. या भागात आणखीही गावठी बॉम्ब आहेत का, याचा शोधही सुरू आहे