(मुंबई)
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने गणेशभक्तांची लगबग वाढली आहे.शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे अनेकजण २७ तारखेपासून गावी कोकणात जाण्यासाठी रवाना होतील. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा टोलमाफीचा निर्णय त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या भाविकांना (वाहनांना) पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने २७ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना पथकरातून सवलत देण्यात येत आहे.
स्टिकर चिकटवणे बंधनकारक
कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांनी “गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पथकर माफी पासेस (त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद असावा) बंधनकारक आहेत. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर. टी. ओ. ऑफिसेस मध्ये ते उपलब्ध करून द्यावेत. हे पास परतीच्या प्रवासाकरता ग्राह्य धरण्यात येतील.