खेड तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाने चांगलाचा तडाखा दिला. शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ग्रामीण भागात अक्षरश: दाणादाण उडाली. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. रस्त्यात झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली.
निगडे, अस्तान, जैतापूर, खोपी, वेरळ, जांबुर्डे, शिर्शि या गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.वीज पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात बुडून गेला. तहसिलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार निगडे येथील लिला मोहिते, अनुष्का मोरे, आस्तान येथील चंद्रकांत मोरे, जैतापूर येथील गोपीनाथ मोरे, गणपत मोरे, सुरेश गोरे, खोपी येथील मोहन ढेबे बाळाराम बर्गे, भागोजी आखाडे, खोपी छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, वेरळ येथील मनोज कदम, जाबुर्डे येथील हरिश्चंद्र पाते, शिर्शि येथील हनीफ मांडलेकर, हलिमा हमदुले तर रजवेल येथील विश्वास निकम यांच्या घरांचे पत्रे उडून तसेच भिती कोसळून नुकसान झाले. या व्यतिरिक्त अन्य गावामध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र त्याचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसल्याने तहसिल विभागाकडून सांगण्यात आले.