(मुंबई)
महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथासाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे.जी.समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथासाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपचार केंद्राचे ई उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथासाठी विशेष कक्ष बाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना श्री. महाजन म्हणाले की, तृतीयपंथाच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, त्या समस्या सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष शुक्रवारी जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथांना पुरुष कक्षात किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथावर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.
या विशेष कक्षात 2 व्हेंटिलेटर, मॉनिटर, सेमी आयसीयू यासह येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जे.जे. रुग्णालयात व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. शुक्रवार पासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असल्याचेही महाजन यांनी सांगितले.