(पाचल / तुषार पाचलकर)
तुळसवडे येथे आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत संपन्न झाले, परंतू या उदघाटन सोहळ्याला स्थानिक आमदार राजन साळवी यांनी बहिष्कार टाकला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब साहेब असताना जिल्हा नियोजनमधून सदर इमारतीसाठी निधी मंजूर झाला. त्या इमारतीसाठी भूमिपूजन करून कामकाज चालू झालं, काम पूर्णत्वाला गेलं आणि इमारत पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन करताना त्याठिकाणी लाईट, पाणी आणि त्या ठिकाणचा कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती करून त्यानंतरच रिक्तसर उद्घाटन व्हायला पाहिजे होतं, परंतू तसं झालं नाही.
उद्घाटन करण्याचा अधिकार नियोजन समितीचा सदस्य आमदार म्हणून मला असायला हवा, पण तसं न करता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा पीए आदिनाथ कपाले व तुळसवडे गावचे उपसरपंच व आदिनाथ कपाळे यांचे बंधू संजय कपाले या दोघांनी परस्पर उदघाटनाचे नियोजन करून बेकायदेशीरपणे लाईट, बेकायदेशीरपणे पाणी घेऊन सदर ठिकाणचा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केल्याने, या बेकायदेशीर उदघाटन सोहळ्याला माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा शंभर टक्के बहिष्कार आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, पालकमंत्र्यांचा निश्चितपणे आम्ही आदर करतो. परंतू पालकमंत्र्यांनी कुठलेही उद्घाटन करताना भूमिपूजन करताना संपूर्ण प्रशासकीय गोष्टीची माहिती घ्यायला, द्यायला लागते आणि त्यानंतर ते उद्घाटन करायला हवं होतं. परंतू तसं झालं नाही, उद्घाटन करण्याचा अधिकार नियोजनाचा आमदार म्हणून शंभर टक्के माझा आहे. परंतू माजी मंत्र्यांचा पीए आदिनाथ कपाळे व उपसरपंच संजय कपाळे यांनी विश्वासात न घेता आजचं उद्घाटन घेतलेले आहे. हे उद्घाटन बेकायदेशीर असल्याने आमच्या याच्यावर बहिष्कार आहे. ज्यावेळी शंभर टक्के काम पूर्ण होईल त्यावेळी मी आमदार म्हणून त्याचे उद्घाटन करेन असेही पुढे ते म्हणाले.
आज सोमवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत, तुळसवडे ता. राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोतं यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बहिष्कार टाकल्याप्रकरणी त्यांनी हे वक्तव्य केलं.
या कार्यक्रमाला अजूनही काही लोकांनी उपस्थिती न दाखवल्याने आजचा तुळसवडे येथील आरोग्य उपकेंद्राचा उदघाट्न सोहळा खरंच बेकायदेशीर आहे की काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.