(चिपळूण)
रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक कृषिभूषण डॉ. तानाजी चोरगे यांना नुकताच अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी संस्थेचा ‘भुदरगड साहित्यभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहू वाचनालय गारगोटी येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत कळके होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अक्षरसागर साहित्य मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी केले. परीचय डॉ. अर्जुन कुंभार यांनी करून दिला. डॉ. तानाजीराव चोरगे यांना जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांचे हस्ते सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन ‘भुदरगड साहित्यभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. के. ए. मोमीन यांच्या ‘काळीजगोष्टी’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. तानाजी चोरगे यांचे हस्ते करण्यात आले.
डॉ. चोरगें यांनी बोलताना आपला ४५ पुस्तक लेखनाचा प्रवास उलगडला. लुप्त होत चाललेली भारतीय संस्कृती, नैसर्गिक आपत्ती, लिव्ह इन रिलेशनशिप आदी सामाजिक समस्येवर त्यांनी आपले विचार मांडले. प्रा. कृष्णात खोत यांनी प्रतिक आणि प्रतिमा यांच्या नादात न अडकता लेखकाने आपली प्रतिभा अबाधित ठेवून ग्रामीण लोकसंस्कृती जतन करत समाजभान ठेऊन लेखन करावे त्याचबरोबर लेखक सत्तेबरोबर कधीच नसतो तर तो सत्त्याबरोबर असतो, असे सांगितले.
यावेळी प्रतिमा इंगोले पुणे, दीपक तांबोळी (जळगाव), डॉ. राजेश गायकवाड (औंढा नागनाथ), विरभद्र मिरेवाड (नांदेड), डॉ. गणपती कमळकर (कागल) यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार तर डॉ. मनःसाद (सोलापूर), भास्कर बंगाळे (पंढरपूर), सुभाष वाघमारे (सातारा), डॉ. सुनील विभूते (बार्शी), डॉ. प्रतिभा जाधव (नाशिक), डॉ. आनंद वारके (बिद्री), दीक्षा गुरव (गंगापूर), साताप्पा सुतार (पुष्पनगर), कुमार हेगडे (कारदगा), मायकेल डिसोजा (करडवाडी), डॉ. अशोक पाटील (पाचर्डे), भरत चौगले (थड्याचीवाडी), अरविंद मानकर (सरवडे) आदींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय धावपटू बजरंग चव्हाण यांचा डॉ. चोरगें यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बा. स. जठार, दीपक मेंगाणे, राहूल देसाई, मंचचे उपाध्यक्ष डी. व्ही. कुंभार, राजन कोनवडेकर, प्रा. शिवाजी चोरगे, नंदकुमार मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज देवाळे तर मानपत्र वाचन प्रा. जयसिंग कांबळे यांनी केले. आभार प्रा. राणी हुजरे-पाटील यांनी मानले.