(ठाणे)
ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केले जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असे जाहीर आव्हानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ठाण्यातील जनक्षोभ मोर्चाला संबोधित केले.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी हे राज्य आज अंधारात गेले असल्याचे सांगत गद्दारांना आम्ही त्यांची जागा दाखवणारच, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले की, एक गद्दार सुप्रिया सुळे यांना जाहीर शिव्या देतो, त्याला मंत्रिमंडळात कायम ठेवले जाते. दुस-या एका गद्दाराने सुषमा अंधारे यांना शिव्या दिल्या, त्याला मांडीला मांडी लावून बसवले जाते. आज रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली, पण पोलिसांनी मारहाण करणा-यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी रोशनी शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला हे दुर्दैवी आहे, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार आता काही महिन्यांचे किंवा काही दिवसाचे नाही तर अवघ्या काही तासांचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांवर यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर या सरकारची चमचेगिरी करणा-या अधिका-यांची चौकशी करणार आणि त्यांना तुरुंगात पाठवणार. आज रोशनी शिंदे रुग्णालयात आहेत. पण त्यांच्या रुमच्या बाहेर पोलिस बसवण्यात आले आहेत. त्या बऱ्या झाल्या, त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच त्यांना अटक करण्यात येईल, हे असे सुडाचे नाट्य सध्या सुरू आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.