(मुंबई)
उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि तीन वेळा मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षण सभापती पद भूषवलेले मंगेश सातमकर यांनी काल (28 जुलै) उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सन १९९४ पासून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असलेल्या सातमकर यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य, एमएमआरडीए समिती सदस्य, शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद भूषवलं आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सातमकर म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी त्यांच्या कामाची चर्चा करणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी तीन वेळा मला भेटून माझ्याशी सर्व विषयावर विस्तृतपणे चर्चा केली. शिवसेनेमध्ये मी गेली 32 वर्षे काम करत असूनही पक्षप्रमुखाना मला कधी भेटायला वेळ मिळाला नाही. त्यानाच काय त्यांचे निकटवर्तीय पदाधिकारी देखील मला माझ्या अडचणी समजून घेण्यासाठी कधीही भेटले नाहीत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना भेटल्यानंतर कार्यकर्त्याचे म्हणणे जाणून घेणारा नेता भेटल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
#मुंबई महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.… pic.twitter.com/JpOld4jQzC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 28, 2023
एखादा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो तेव्हा नेत्याने मागे ठामपणे उभे रहावे, अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा अडचणी येतात तेव्हाच नेमकं पाठबळ मिळालं नाही तर मग कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळायचे. अनुभवी कार्यकर्ता घडवायला खूप वेळ लावतो मात्र तो गमवायला एक क्षण पुरतो. त्यामुळे शिवसेनेमध्ये मंगेश सातमकर यांना पूर्णपणे न्याय देण्यात येईल. तसेच त्यांच्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न राज्य शासनाच्या पुढाकाराने नक्की सोडवले जातील, अशी ग्वाही मुख्यंमत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी तसेच सातमकर यांच्या प्रभागातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.