रत्नागिरी : कोविड -19 लसीकरण राज्यांमध्ये सुरु करण्याबाबत शासनस्तरावरुन सुचना दिलेनुसार दिनांक ३ जानेवारी रोजी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड -19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
१५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण डॉ. श्री. अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणनगर, रत्नागिरी येथे शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण आठवड्यातून दोन वार म्हणजेच बुधवार व शनिवार या दोन दिवशी घेण्यात येत आहे. सदरच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार आहे. सदरचे लसीकरणाचे नियोजन कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालये येथे केल्यास लसीकरणाला गती मिळणेस मदत होईल असे डॉ. श्री. अनिरुध्द आठल्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत डॉ. श्री. एम. एम. सुर्यवंशी वैद्यकिय अधिकारी तथा प्रभारी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. श्री. परिमल र. गोडे वैद्यकिय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणनगर रत्नागिरी, डॉ. श्री. सुधीर सु. दुसाने वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोतवडे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कोविड -19 लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बी. एन. पाटिल, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद रत्नागिरी व उदयजी बने उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व बांधकाम समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी नागरिकांना केले आहे.