(रत्नागिरी)
आंब्याच्या पक्वतेच्या व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी इथिनील गॅस चेंबरची प्रणाली रत्नागिरी जिल्ह्यात 4 ठिकाणी कार्यान्वित झाली आहे. यासाठी आवश्यक असणारा परवानाही अन्न व प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा मानके नियमावली 2011 अंतर्गत फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कार्बाइड वायू अथवा एसिलिटीन वायूच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. कारण या वायूंच्या सान्निध्यात फळे आल्यास व त्या फळांचे ग्राहकाने सेवन केल्यास त्याच्या आरोग्यास याचा धोका होण्याचा संभव असतो. अशावेळी यावर पर्याय म्हणून इथिलीन गॅस चेंबर आंब्यासाठी अधिक स्वरुपात उपयुक्त ठरणारी आहेत.
आडिवरे, गावखडी, मावळंगे आणि रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात ही चेंबर्स कार्यान्वित करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून आंबा पिकवण्यासाठी इथिलीन गॅस सोडण्यात येईल. हा गॅस आंब्यात नैसर्गिकरित्या असणाऱ्या इथिलीन गॅसला संप्रेरणा देईल. शिवाय आंब्याच्या परिपक्वतेच्या प्रक्रियेत सहाय्यकाची भूमिका पार पाडेल.