गळकी इमारत, अस्वच्छ परिसर, साठलेला कचरा या जिल्हा रुग्णालयाच्या अव्यवस्थेची जबाबदारी निश्चित करून कारवाई करा. जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत टीका करण्याची ही वेळ नाही हे जरी खरं असलं, तरी जिल्हा रुग्णालय इमारत, त्याची व्यवस्था, परिसर याकडे इतके दुर्लक्ष करणे ही बाब खूप गंभीर असून या हलगर्जीपणाबाबत जबाबदारी निश्चित करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
काल झालेल्या पावसात इमारतीच्या आत ऑपरेशन थेटर बाहेर अंतर्गत जिन्यावर लिफ्टच्या दारात पाणी गळती दिसत होती. गंभीर रोगाची साथ चालू असताना स्वच्छतेचे महत्त्व वाढते आणि अशावेळी पावसाचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर गळणे आणि साचणे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. हॉस्पिटल परिसरात साठलेला कचरा हा तर कहर होता. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले नागरिक, त्यांना पाहावयास आलेले नातेवाईक, हॉस्पिटल मधील कर्मचारी या सगळ्यांना धोका निर्माण करणारी ही स्थिती आहे.
इमारतीचा मेंटेनन्स, दुरुस्ती, स्वच्छता याबाबतची जबाबदारी कोणाची ? यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे आणि नियमित पाऊस सुरू होण्यासाठी अजून थोडा अवधी आहे. त्या अवधीचा वापर करून गळती बंद करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना झाली पाहिजे, अशी मागणी भा.ज.पा. रत्नागिरी तर्फे केली आहे.