(चिपळूण)
तालुक्यातील कळंबस्ते-बौद्धवाडी येथे जाळ्यामध्ये अडकलेल्या धामण प्रजातीच्या सापाची वनविभागाने सुटका केली. सापाला सुरक्षित ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आनंद भंडारी यांच्या घराच्या परिसरामधील धामण प्रजातीचा साप जाळ्यामध्ये अडकला होता. त्याची माहिती दूरध्वनीद्वारे वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर तत्काळ वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सापाला जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान सापाला सुखरूप बाहेर काढण्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या सापाला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले.
या बचावकार्यात राहुल गुंठे, वनरक्षक कोळकेवाडी व नंदकुमार कदम, वाहनचालक यांनी धामण प्रजातीच्या सापाला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.