(नवी दिल्ली)
जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत, तसेच ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या बिगरसरकारी संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तरित्या आणि दै. ॲग्रोवनला ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
विज्ञान भवनात मंगळवारी (दि. 29) तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी 11 श्रेणीत 57 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळीवरील प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या राज्य, संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार्थींना मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे.
पश्चिम क्षेत्रातील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आला. तर उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, नगरपंचायत अध्यक्ष ममता बिपीन मोरे, नगरपंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्निल महाकाळ यांनी स्वीकारला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्जीवन मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली. त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले. त्यामुळे आता भरपूर पाणीसाठा होत आहे. यामुळे नगरपंचायत टँकरमुक्त झाली असल्याची प्रतिक्रिया ममता मोरे यांनी दिली.
उत्कृष्ट बिगर सरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुद्रित आणि प्रसार माध्यमांनी जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामांच्या श्रेणीमध्ये ॲग्रोवन, सकाळ मिडीया प्रा. लि. या संस्थेलाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ॲग्रोवनचे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांनी स्वीकारला.