(रत्नागिरी)
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितित जनजागृतीपर चार चित्रफितींचे लोकार्पण करण्यात आले. सायबर क्राइम, रस्ते अपघात सुरक्षा, महिला सुरक्षा, जनजागृती व ड्रिंक अँड ड्राइव टाळणे, जनजागृती यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे कोंकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रवीण पवार यांच्या शुभ हस्ते व पोलीस अधीक्षक, धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, जयश्री गायकवाड तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितित हे लोकार्पण करण्यात आले.
सायबर गुन्हेगारी चे वाढते जाळे व त्यामध्ये फसणारी सामान्य जनता, विशेष करून आपल्या नित्याच्या वापरात असणाऱ्या भ्रमणध्वनीवर द्वारे येणाऱ्या असंख्य फसव्या संदेशांना आपण ओळखून कसे दुर्लक्ष केले पाहिजे अथवा ब्लॉक अँड रीपोर्ट केले पाहिजे याची माहिती सायबर क्राइम, जनजागृती या चित्रफीतून सांगण्यात आली आहे. काहीवेळा रस्ते अपघाता मध्ये आपल्या जवळच्या किंवा अत्यंत प्रिय व्यक्तीला गमवावे लागते, किंवा अपांगत्वाला देखील सामोरे जावे लागते, म्हणून अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे हे रस्ते अपघात सुरक्षा जनजागृती चित्रफीतीतून दर्शवण्यात आले. रात्री बेरात्री संकटात सापडलेल्या, आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध पोलीसांना साद घालण्यासाठी किंवा महिलांना असुरक्षित वाटल्यास आपल्या सुरक्षेकरिता डायल 112 किंवा 1091 या संपर्क क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा या हेतूने सादर करण्यात आलेली महिला सुरक्षा, जनजागृती चित्रफीत आहे तसेच मद्य प्राशन करून आपले वाहन चालवणे हे किती घातक असते व परिणामी हे आपला व आपल्या सख्या सवंगड्यांचा, नातेवाईकांचा, जीवलगांचा जीव ही घेऊ शकते हे दर्शवणाऱ्या ड्रिंक अँड ड्राइव टाळणे, जनजागृती या चित्रफीती द्वारे सादर करण्यात आले आहे.
यावेळी जनजागृतीपर, चित्रफितींचे लोकार्पण सोहळ्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. प्रवीण पवार यांच्या हस्ते रत्नागिरी पोलीस दलामध्ये गुन्हे तपासमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला.