(चेन्नई)
CSK ने IPL 2023 मध्ये पहिला विजय मिळवला आहे. सोमवारी (३ एप्रिल) एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अटतटीच्या लढतीत चेन्नईने लखनौ सुपर जायंट्सचा १२ धावांनी पराभव केला. सीएसकेच्या विजयाचा हिरो मोईन अली ठरला, त्याने चार विकेट घेतल्या. ऋतुराज गायकवाड याने अर्धशतकी खेळी केली. चेन्नईने दिलेले २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने २०५ धावांपर्यंत मजल मारली. लखनौचा पराभव करत चेन्नईने आयपीएलच्या १६ व्या हंगामातील पहिला विजय नोंदवला.
लखनौचा सलामी फलंदाज काइल मेयर्स याने सलग दुस-या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. काइल याने पावरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडला. चेन्नईच्या सर्वच गोलंदाजाचा त्याने समाचार घेतला. मेयर्स याने अवघ्या २२ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि दोन षटकार लगावले. मेयर्स याने राहुलसोबत ३३ चेंडूत ७९ धावांची सलामी दिली.
दरम्यान, लखनौचा कर्णधार केएल राहुल याला दुस-या सामन्यातही धावा जमवता आल्या नाहीत. पहिल्या विकेटसाठी मेयर्ससोबत ७९ धावांची भागिदारी केली. पण यामध्ये मोठा वाटा मेयर्स याचाच होता. मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुड्डानेही आपली विकेट फेकली. त्यानंतर राहुलही तंबूत परतला.
राहुलने १८ चेंडूत फक्त २० धावांची खेळी केली. या खेळीत राहुलला एकही षटकार लगावता आला नाही. दीपक हुड्डा यालाही धावगती वाढवता आली नाही. हुडा फक्त दोन धावा काढून बाद झाला. तर क्रृणाल पांड्या ९ धावा काढून तंबूत परतला. विस्फोटक स्टॉयनिस यालाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. स्टॉयनिस याने १८ चेंडूत २१ धावांचे योगदान दिले. या दरम्यान पुरनने जोरदार फटकेबाजी करीत आशा उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतर धावगती कमी झाली. त्यातच कृष्णाप्पा गौतम आणि आयुष बदोनी यांनी चांगली खिंड लढविली. परंतु त्यांना विजयात रुपांतर करता आले नाही. मात्र, त्यांच्या प्रतिकारामुळे अवघ्या १२ धावांनी चेन्नईची विजय झाला.
चेन्नईसाठी शेवटच्या षटकात अंबाती रायडूने १४ चेंडूत नाबाद २७ धावा करत संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या षटकात धोनीने २ शानदार षटकारही ठोकले, ज्यामुळे चेन्नई संघ २० षटकात ७ विकेट गमावून २१७ धावांपर्यंत मजल मारू शकला. लखनौकडून गोलंदाजीत मार्क वुड आणि रवी बिश्नोई यांनी ३-३ बळी घेतले.