(चिपळूण)
शहरानजीकच्या खेर्डी शिवाजीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या घरात लपून बसलेल्या बिबट्याने वृद्धावर अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात वृद्ध जखमी झाले असून ही घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. कालांतराने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र, बिबट्याचा मृत्यू उपासमारीने झाले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी १ वाजता खेर्डीमधील शिवाजीनगर (वरची खेर्डी) येथील डोंगर उतारावरील रमेश बाबू वास्कर (वय ७३) यांचे मालकी जागेत घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी ते स्वतः आणि सोबत असललेले जावई विलास कृष्णा धामणस्कर व मुलगा राजेश रमेश वास्कर हे या बांधकामांवर पाणी मारण्यासाठी सकाळी ९:३० ते १०.०० चे दरम्यान गेले होते. त्याठिकाणी बिबट्या लपून बसला होता. दरम्यान, रमेश बाबू वास्कर हे तेथे जावून फळ्या उलचण्यासाठी वाकले असताना बिबट्याने अचानक हल्ला केला व त्यांना जखमी केले. त्यावेळी रमेश वास्कर यांनी आरडाओरडा केल्याने सदरचा बिबट्या तेथून पळाला. त्यानंतर रमेश वास्कर यांना पुढील उपचारासाठी त्यांच्या मुलाने बहादूरशेख चिपळूण येथील डॉ. चव्हाण यांचे दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यासाठी दाखल केले.
त्यानंतर राजेश रमेश वास्कर हे पुन्हा बांधकामांकडे गेले असता, त्यावेळी सदर बिबट्या तेथेच असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी ही गोष्ट दुपारी १३.०० चे सुमारास वनविभागाचे अधिकारी श्री. गुंठे आणि श्री. भोसले व उपसरपंच श्री. भुरण यांना कळवले. यावेळी ही माहिती वरीष्ठांना कळवण्यात आल्याने वनक्षेत्रपाल राजेश्री किर या पथकासह जागेवर पोहोचल्या होत्या. याबाबत पोलिस स्टेशन येथे कळवल्याने पोलीस स्टाफही जागेवर पोहोचले. त्यानंतर सदर बिबट्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले. सदरचे प्रयत्न चालू असताना बिबट्या प्राण्याची हालचाल होत नसल्याचे दिसून आले व तो मृतावस्थेत आढळला.
पशुवैद्यकीय अधिकारी श्री. डॉ. पिसे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. सदर मृत बिबट्याचा मृत्यु उपासमारीमुळे झाला असल्याचे डॉ. पिसे यांनी सांगितले. जखमी श्री. रमेश वास्कर यांची वनविभागच्या वरीष्ठांनी जाऊन भेट घेतली व विचारपूस केली. शासकीय नियमाप्रमाणे वास्कर यांना शासनाकडून मिळणा-या मदतीबाबत सांगून त्याबाबत पुढील कार्यवाही चालू केली आहे.
या संपूर्ण कारवाईमध्ये विभागीय वनाधिकारी दिपक खाडे यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांचे नेतृत्वात वनक्षेत्रपाल राजेश्री किर, वनपाल चिपळूण, वनपाल सावर्डे, वनपाल खेड शिवाय वनरक्षक इरमले, मंत्रे, कराडे, बंबर्गेकर, दुंडगे, शिंदे, बिराजदार आणि बाळा शिर्के, नंदु कदम, पांडुरंग कदम याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी पिसे व उपसंरपच खेर्डी श्री. भुरण यांनी सहभाग घेतला होता.