( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण-कराड रोडने जात असताना दुचाकी घसरुन जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निवृत्ती गोविंद जाधव (38, कोंडफणसवणे, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महादेव अनंत जाधव (44, कोंडफणसवणे, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली. ही घटना 20 जुलै रोजी रात्री 7.40 च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती जाधव हा आपल्या ताब्यातील स्प्लेंडर प्लसवरुन 14 जुलै रोजी कराड-चिपळूण रोडने चिपळूणकडे जात होता. पिंपळी नितवड गणेशनगर येथे आला असता सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास दुचाकी घसरुन पडलेल्या स्थितीत बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यांना चिपळूणातील एस. एम. एस. हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असताना 20 जुलै रोजी रात्री 7.40 च्या दरम्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केेले. याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करत आहेत.