(चिपळूण/प्रतिनिधी)
चिपळुणातील एन. एस.जी. फिटनेसचा खेळाडू तसेच वाशिष्ठी मिल्क अँण्ड मिल्क प्रोडक्ट कंपनीचा सिक्युरिटी ऑफिसर समीर विकास मोरे याने दि. ३ आणि ४ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भारत श्री किताब पटकावले आहे. या कामगिरीबद्दल काँग्रेसच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे प्रदेश सचिव तसेच चिपळूण काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समीरसह त्याचे प्रशिक्षक नंदकिशोर शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत देशातील १७ राज्यातील १८८ निवडक स्पर्धक सहभागी झाले समिर होते. समीरने त्यांच्यावर मात करीत सुवर्ण पदक पटकाविले आणि चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. ग्रुप विजेता होताना आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबसाठी दोन्ही वेळेला टाय झाली. पण आपल्या पिळदार शरीर आणि सर्वोत्कृष्ट पोजिंगवर त्याने प्रेक्षक आणि पंचांची मने जिंकली. समीरने दोन महिन्याच्या अंतरात भारत श्री या शरीरसौष्ठव स्पर्धेत सलग दोन वेळा सुबर्ण पदक पटकाविले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे त्याचे प्रशिक्षक नंदकिशोर शिंदे यांनी सांगितले.
शरीरसौष्ठव खेळ हा खरंतर खर्चिक खेळ आहे. त्यासाठी लागणारा आहार हा सामान्य माणसांना न परवडणारा असून समीर मोरे हा सामान्य शेतकरी कुटुंबातीला मुलगा आहे. पण आपल्या परिस्थितीवर मेहनतीने मात करीत समीर संपूर्ण भारतात अब्बल ठरला आहे. त्यासाठी समीरला आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर नंदकिशोर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समीर मोरे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे. तो देशासाठी शरीरसौष्ठव स्पर्धेत पदक प्राप्त करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. हे स्वप्न तो नक्की पूर्ण करेल, असा विश्वास त्याचे प्रशिक्षक नंदकिशोर शिंदे यांनी व्यक्त केला आहे.