(चिपळूण)
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला तीन किलो वजन आणि सव्वीस सेंटीमीटर उंची असलेली अश्वारूढ खंडोबाची मूर्ती मिळाली आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची ही मूर्ती चिपळूणचे पहिले नगराध्यक्ष कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील आहे. पत्की यांच्या घराण्यात वारस नसल्यामुळे नित्यपूजेतील ही मूर्ती मोहन चितळे यांच्याकडे दिली होती. चितळे यांनी या मूर्तीसह आणखी दोन पूजेतील मुद्रांकित मूर्ती (टाक) लो.टि.स्मा.च्या संग्रहालयास नुकतेच भेट दिले.
ब्रिटीश भारतात चिपळूण नगरपालिकेच्या शासननियुक्त नगराध्यक्ष यांना कार्यकारी अधिकारी म्हणत असत. पहिले अधिकारी म्हणून कै. रंगनाथ बापूजी पत्की यांची शासनाने निवड केली होती. १८७७ ते १९०७ असे सलग तीस वर्ष कै. पत्की या पदावर कार्यरत होते. पत्की हे चिपळूण शहरातील सर्वमान्य व्यक्तिमत्व होते. शहरात त्यांची मोठी मालमत्ता होती. शहरात आज उभे असलेले मच्छीमार्केट व मटनमार्केटची जागा पत्की यांची होती. नवा भैरी मंदिराची जागाही पत्की यांनीच दिली होती. शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असलेल्या माधवबाग या ठिकाणी त्यांचा वाद होता. कालांतराने त्यांच्या वंशजांनी ही जागा रा. स्व. संघाला दिली. चिपळूण नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष पद भूषविलेल्या पत्की यांचे दुर्दैवाने आज छायाचित्र उपलब्ध नाही. लो.टि.स्मा.ची आजची इमारत असलेली जागा कै. पत्की नगराध्यक्ष असताना वाचनालयाला कराराने देण्यात आली होती. दीडशे वर्षांपूर्वीचे हे करारपत्र वाचनालयात उपलब्ध आहे.
कै. रंगनाथ बापूजी पत्की यांच्या नित्यपूजेतील ही मूर्ती लो.टि.स्मा.साठी अविस्मरणीय भेट आहे. वाचनालयाचे संचालक मधूसुदन केतकर, कार्यवाह विनायक ओक, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, संजय शिंदे यांनी मोहन चितळे यांच्याकडून ही मूर्ती सन्मानपूर्वक वाचनालयात आणली. यावेळी वाचनालयातर्फे मोहन चितळे यांना मधूसुदन केतकर यांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. लोटिस्मा संग्रहालयात विशेष देव्हारा करून त्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे. मोहन चितळे यांनी ही अमूल्य मूर्ती भेट देऊन शहराचे माजी नगराध्यक्ष कै. पत्की यांची सदैव आठवण राहील यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल लो.टि.स्मा.चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.