( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळुणात चाललय तरी काय? सतत काही ना काही घटना घडत आहेत. 10 जानेवारी रोजी एका वृध्दावर कोयतीने वार केल्याची घटना घडली. थकलेले घरभाडे मागितल्याच्या रागातून तरुणाने थेट कोयतीने हल्ला केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर त्या वृध्दाच्या गळातील 75 हजाराची चैनदेखील त्या तरुणाने चोरली. वृध्दावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून यापकरणी तरुणावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य महादेव मोरे (मुळ-गुढे, सध्या मार्गताम्हाने-उगवतवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद चंद्रकांत रामाजी चव्हाण (78, मार्गताम्हाणे- उगवतवाडी) यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत चव्हाण हे मार्गताम्हाने- उगवतवाडी येथे एकटेच राहतात. आणि त्यांनी आपल्या शेजारी भाडेकरु ठेवला आहे. त्यांच्या चौथ्या भाड्याच्या खोलीत महादेव मोरे व त्यांचा मुलगा आदित्य मोरे राहतात. महादेव मोरे यांच्याकडून चंद्रकांत चव्हाण यांना 18 हजार रुपये भाडे येणे होते. त्यातील 4 हजार रुपये घरभाडे मिळाले. उर्वरित 14 हजार रुपये घरभाडे येणे बाकी होते. महादेव मोरे हे त्याचे मुळ गाव गुढे येथे राहत असताना त्याच्या खोलीमध्ये आदित्य हा एकटाच राहतो. 10 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आदित्य मोरे हा चंद्रकांत चव्हाण यांच्या घरी आला. त्यावेळी त्यास चव्हाण यांनी थकलेल्या घरभाड्याची विचारणा केली. घर भाड्याची विचारणा केल्याचा राग आल्याने चव्हाण यांच्या घरातील कोयतीने त्यांच्या डोक्यात कोयतिने हल्ला केला. यानंतर चव्हाण गंभीर जखमी झाले. ते विव्हळत असताना आदित्यने त्यांच्या गळयातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन चोरुन नेली.
या घटनेनंतर चव्हाण यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.