( खंडाळा )
खंडाळा महावितरणाच्या कारभाराबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये नाराजी असून या कार्यालयामध्ये कार्यरत असणारे उपअभियंता श्री योगेश खैर हे सर्वसामान्य ग्रामस्थांना उद्धट उत्तरे देत असून याबाबत आवाज उठवण्यासाठी ग्रामपंचायत कासारी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलन करून लाक्षणिक उपोषण करण्याच्या तयारीत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाष्टे यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांडेलावगण गावातील एका घरातील लाईट गेली असल्याने लाईट चालू करण्यासाठी चार दिवस खंडाळा महावितरण अधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. याबाबत येथील उपअभियंता योगेश खैर यांना ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाष्टे यांनी विचारणा केली असता त्यांनी ‘आम्ही काहीही करू शकत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ असे अरेवारीचे उत्तर दिले. एका ग्रामपंचायत सदस्याला जर हे अधिकारी अशा प्रकारची वागणूक देत असतील तर सर्वसामान्य ग्रामस्थांची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेलीच बरी असे त्यांनी यावेळी सांगितले.
दुसरा प्रसंग सुद्धा या ठिकाणी घडला आहे. 15 दिवसांपूर्वी गावातील एका घरातील वीज मीटर दोन महिन्यांचे वीजबिल भरले नसल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढून नेला. खंडाळा विभागात हजारो लाखो रुपये वीज बिलांची थकबाकी आहे. मात्र गरिबांचेच मीटर कापण्याचे काम या कार्यालयाकडून केले जाते ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
गेले काही महिने कागदोपत्री कोणताही वायरमन सांडेलावगण गावाला मिळालेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे विशेषत: ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाष्टे यांच्याशी या अधिकाऱ्याचे खटके उडालेले आहेत. कारण कधीही कोणत्याही वायरमन ला फोन केला तर हे गाव मला दिलेले नाही, मी तिथे काम करायला येऊ शकत नाही. अशी उत्तरे वायरमन कडून मिळत होती. त्यामुळे या गावाला कायमस्वरूपी वायरमन मिळावा अशी वारंवार विनंती करूनही कोणतीही कार्यवाही अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा ठराव करून कायमस्वरूपी वायरमन मिळावा अशी मागणी करण्यात आली. ठराव दिल्यानंतर एका आठवड्याने याबाबत विचारणा केली असता, उपअभियंता खैरे यांनी असे कोणतेही पत्र किंवा ठराव या कार्याकडे प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. याचा अर्थ ग्रामपंचायतीच्या ठरावांनाही अधिकारी केराची टोपली दाखवत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे? असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने विचारला आहे.
खंडाळा महावितरणाच्या या सर्व अनागोंदी कारभाराबाबत आवाज उठवण्यासाठी आंदोलन छेडण्याचे येथील ग्रामस्थांनी ठरवले असल्याची माहिती मिळत आहे.