(सिंधुदुर्ग)
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून (छत्तीसगड रिझर्व पोलिस) हे कर्नाटक-रायबाग या ठिकाणी बंदोबस्ताला आले होते. काही काळ सुट्टीचा मिळाल्यामुळे छत्तीसगड पोलिसात कार्यरत असलेले एकूण पाच जण गोव्याला पर्यटनासाठी गेले. लघुशंकेसाठी अंबोली घाटात खाली उतरलेल्या मीतिलेस पॅकेरा यांचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.
गोव्याहून पर्यटन करून परतत असताना तीन पोलिस लघुशंकेला आंबोली घाटातील धबधब्याजवळ उतरले. त्यातील मीतेलेस पॅकेरा हा दरीच्या दिशेने गेला. परंतु तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरून तो जवळपास 300 फूट खोल खाली कोसळला. रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं हे त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना सुद्धा कळलं नाही. त्यांनी आंबोली पोलिस स्थानकात संपर्क केला. आंबोली पोलीस आणि आंबोली रेस्क्यू टीम घटनास्थळी जात मीतेलेश याला केवळ 30 मिनिटात खाली दरीत उतरत प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला.
रेस्क्यू टीम खाली पोहोचले त्यावेळी मितीलेश थोडे शुद्धीत होते. परंतु काही वेळात त्यांनी प्राण सोडला. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम मार्फत त्याचा मृतदेह वर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आला. रविवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.