(संगमेश्वर / प्रतिनिधी)
गणेशोत्सव कोकणवासियांचा एक महत्वाचा सण! येत्या काही दिवसात बहुतेक कोकणवासीय मोठ्या संख्येने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणार आहेत. सध्या या महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असुन जुना डांबरी रस्ता उखडुन मोठमोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापुर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाची खासदार श्री.विनायक राऊत यांनी रविवारी (दिनांक १० सप्टेंबर २०२३) या महामार्गावरील लांजा, वाकेड ते संगमेश्वर या टप्प्यातील रस्त्याची पाहणी केली.
यावेळी वाकेड ते लांजा मार्गावरील कॉंक्रीटीकरण झालेला रस्ता व जुना डांबरी रस्ता यांना जोडणा-या भागात असलेले खड्डे तसेच लांजा शहराच्या रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेले लोखंडी बॅरीकेट्स यामुळे होणारी वाहतुक कोंडी व नागरीकांना होणारा त्रास याविषयी अधिकारी व कंत्राटदार यांना आवश्यक त्या सुचना राऊत यांनी दिल्या.
पाली बसस्टॅन्ड व संपुर्ण बाजारपेठेतून जाणा-या महामार्गाचे काम प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असुन त्याचा फटका ग्रामस्थ, व्यापारी तसेच नजीकच्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्यावर राऊत यानी सदर ठिकाणी दिवस रात्र काम सुरू ठेवून गणेशोत्सवापुर्वी रस्ता खड्डेमुक्त करा अशा सुचना दिल्या आहेत.
यापुढील भागात चरवेली गाव, झरेवाडी, हातखंबा वाहतुक पोलीस चौकीजवळ तसेच हातखंबा तिठा ते निवळी गाव, निवळी घाट, बावनदी ते तळेकांटे भागात सुरू असणारे खोदकाम व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी याबाबत आवश्यक सुचना राऊत यांच्याकडुन देण्यात आल्या. वांद्री बौद्धवाडी येथील खोदकामामुळे स्मशान भूमीकडे जाण्यास वाट न उरल्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले. आंबेड बुद्रुक येथील महामार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजुस भराव खचुन रस्ता उंच-सखल झाल्याचे पाहणी दरम्यान आढळुन आले असता यावर योग्य तो उपाय तातडीने करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी येणारे चाकरमानी व ग्रामस्थ यांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने महामर्गाची दुरुस्ती ताबडतोब करण्यात यावी अशा प्रकारची सुचना संबधित अधिकारी व कंत्राटदार यांना विनायक राऊत यांनी दिल्या आहेत. या पाहणी दौ-यात महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.जाधव व इतर अधिकारी वर्ग तसेच कंत्राटदार कंपनीचे अधिकारी सहभागी झाले होते.
खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या सूचनांची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन अधिकारी वर्गाकडुन देण्यात आले. या पाहणी दौ-यात खासदार राऊत यांच्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख श्री.राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख श्री.विलास चाळके, पं.स.देवरुख माजी सभापती श्री.जया माने व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.