(गणपतीपुळे / वैभव पवार)
महत्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे किनार्यावर आता चोवीस तास सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे. पोलिस प्रशासनाच्या सुचनेनुसार गणपतीपुळे देवस्थान समितीकडून समुद्र किनार्यावर पाच आणि मंदिर परिसरात तीन असे एकूण आठ कॅमेरे लावले आहेत. किनार्यापासून खोल समुद्रात साधारणपणे दोनशे मीटर आतील दृश्य टीपू शकतील असे दर्जेदार कॅमेरे जोडण्यात आले आहेत.
भौगोलिक रचनेमुळे आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे येथील किनारा पोहण्यासाठी धोकादायक म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत यांच्यासह देवस्थानकडून केलेल्या उपाययोजनांमुळे बुडण्याच्या घटनांवर आळा घालण्यात यश आले आहे. बोटींग सुरु झाल्यामुळे हा किनारा अधिक सुरक्षित झाला आहे. तरीही वाढती गर्दी पाहता या किनार्यावरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकुर्णी यांच्या सुचनेनुसार जयगड पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या पदाधिकार्यांशी संर्पक साधला होता. त्यानुसार मागील आठवड्यात किनार्यावर पाच दर्जेदार कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे खोल समुद्रात पोहण्यासाठी जाणार्या पर्यटकांना वेळीच रोखणे शक्य होईल. तसेच बुडणार्यांवरही करडी नजर ठेवता येणार आहे.
गर्दीमध्ये पॉकिटमारी, चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यालाही यामुळे आळा बसू शकतो. अनेकवेळा गर्दीमध्ये लहान मुले हरवण्याच्या घटना घडतात. अशावेळी त्यांना शोधणे कॅमेर्यामुळे सोपे होते. मंदिरासमोरील किनार्यावर चार कॅमेरे, पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस किनार्यावर एक आणि मंदिर परिसरात तिन कॅमेरे लावण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही हा किनारा सीसीटीव्हीमुळे सुरक्षित झाला आहे. कॅमेराची माहिती मंदिरातील यंत्रणेबरोबरच पोलिसांना कळावी यासाठी वायफायद्वारे गणपतीपुळे पोलिस चौकीतील संगणकाला जोडून घेण्यात येणार आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या सुचनेनुसार देवस्थानच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली होती. त्यांनीही तात्काळ यावर कार्यवाही केली आहे. किनारी भागासह परिसरात दर्जेदार कॅमेरे लावले आहेत.
– जे. एच. कळेकर, पोलिस निरीक्षक, जयगड