(गणपतीपुळे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बोटिंग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्याचा पाण्यात आकडी येऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
याबाबत गणपतीपुळे पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, गणपतीपुळे समुद्रकिनारी व्यावसायिक बोट मालकांकडे संजय विठ्ठल कुरटे ( वय 48) राहणार, वरची निवेडी पात्येवाडी हा काम करत होता. मात्र त्याला एक वर्षापासून आकडी येण्याचा प्रकार चालू होता. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास लाईफ जॅकेट घालून समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी गेला असता आंघोळ करताना त्याला आकडी आली व तो पाण्यामध्ये बुडायला लागला.
यावेळी गणपतीपुळे समुद्रावर असणारे गणपतीपुळे ग्रामपंचायत जीवरक्षक व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल जाधव व प्रशांत लोहळकर यांनी संजय विठ्ठल कुरटे याला पाण्याच्या बाहेर काढून देवस्थानच्या ॲम्बुलन्सने उपचारासाठी मालगुंड आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. यावेळी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वालिया यांनी त्यांची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
रात्री उशिरापर्यंत संजय कुरटे यांच्या मृतदेहाची पोस्टमार्टम करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत गणपतीपुळे पोलीस दुरक्षेत्रामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल जाधव व पोलीस नाईक प्रशांत लोहळकर करीत आहेत.