(गणपतीपुळे/वैभव पवार)
विविध ठिकाणी कातळशिल्पे शोधून काढली जात असतानाच रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी 13 मे रोजी प्राचीन दगडी शिल्प आढळून आले आहे. हे दगडी शिल्प शके1872 मधील असून या शिल्पावर शिवलिंग व पादुका कोरण्यात आल्या आहेत.
हे दगडी शिल्प शुक्रवारी गणपतीपुळे समुद्र किनार्यावर कार्यरत असलेले छायाचित्रकार आर्यन शहा, जीवरक्षक उमेश म्हादये व विक्रम राजवाडकर यांना आढळून आले. त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर हे शिल्प आणून ठेवले. या दगडी शिल्पावर शिल्पकार बा.न. सरनाईक यांचे नाव कोरलेले दिसून येत आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सध्या उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने विविध ठिकाणाहून पर्यटक येत आहेत. या कारणाने पर्यटकांची नेहमीच गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर रेलचेल सुरू असताना शुक्रवारी समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असणारे छायाचित्रकार आर्यन शहा यांना समुद्रकिनाऱ्यावर हे दगडी शिल्प आढळून आले. त्यांनी याची कल्पना जीवरक्षक विक्रम राजवाडकर व उमेश म्हादये यांना दिल्यानंतर त्यांना ही दगडी मूर्ती असल्याचे दिसले. परंतु त्यावर शके 1872 व शिल्पकाराच्या नावाचा उल्लेख असल्याने हे दगडी शिल्प असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हे दगडी शिल्प समुद्र किनाऱ्यावर आणून ठेवल्याबद्ल छायाचित्रकार आर्यन शहा व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक गणपतीपुळे परिसरात होत आहे.