(खेड / भरत निकम)
खेड शहरासह भरणेनाका, वेरळ, चिंचघर, फुरुस आदी गावातील मुख्य ठिकाणी मटका जुगार मोठ्या प्रमाणावर खेळला जात असल्याचे चित्र आहे. मात्र, खेड पोलीसांकडून या अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई होताना दिसत नाही. अशा जोमाने चाललेल्या धंद्यांवर आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.
खेड शहरात एसटी स्थानक परिसर, बाजारपेठ, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक अशा भागात राजरोसपणे मटका जुगार खेळ जोमाने खेळला जात असल्याचे बोलले जात आहे. भरणेनाका या शहराजवळच्या गावात तर अनेक ठिकाणी हा खेळ अक्षरशः रस्त्यावर मांडलेला दिसतो. मात्र याबाबत उघडपणे कुणीही बोलण्यास तयार नाही. अशा ठिकाणाहून अनेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी ये-जा करीत असतात. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासावर याचे दुरगामी परिणाम होत आहेत, हे कुणाच्याही लक्षात येऊ नये हे दुर्दैव आहे.
खेडमध्ये मटका जुगार खेळ जोरदार चालतो. हा खेळ अक्षरशः रस्त्यावर हा बाजार भरणेनाका भागात मांडलेला प्रकार तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी हे धंदे पूर्णपणे बंद करण्याचे काम केले. यानंतर त्यांची बदली होईपर्यंत ते धंदे बंद होते. यानंतर हळूहळू हे जुगार मटक्याचे अड्डे सुरु झाले आहेत, हे भरणेनाका परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अशा गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खेड आणि भरणे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे सुरु आहेत. हातभट्टीची दारु मोठ्या प्रमाणावर विक्री येथे केली जाते. या सर्व अवैध धंद्यांवर एकाचवेळी पोलीस कारवाई करतील काॽ याकडे दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. ही कारवाई केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.