(खेड / भरत निकम)
शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असून नगरपरिषदेसह तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशासन घरोघरी सर्व्हेक्षण करुन जनजागृती करीत असताना साथ आटोक्यात येत नाही. रुग्ण संख्येचा आकडा वाढत असून खोंडे व भरणे येथे ६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकुण रुग्णसंख्या ६६ झाली आहे.
शहरातील समर्थनगर, तीनबत्तीनाका, पावसकरनाका परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असून या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम करत आहेत. तालुक्यातील जवळपास १३ गावातून डेंग्यूची साथ पसरत असल्याने आरोग्य खात्याने आरोग्यसेवक आणि आशा सेविका यांच्या पथकाकडून रुग्णशोध मोहिमेबरोबर जनजागृतीचे काम चालू आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी शहरात व ग्रामीण भागात घरोघरी जनजागृती व उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. या तपासणी मोहिमेत एसटी स्थानक परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत डेंग्यूच्या अळ्या शोधून सापडल्या आहेत. या परिसरात फवारणी व स्वच्छतेचे काम सुरु आहे. सोबत जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
डेंग्यूचे रुग्ण शहरासह ग्रामीण भागातील गावात दिवसागणिक वाढतच आहेत. नगरपरिषद हद्दीत नव्या जून्या बांधकामांना पाणी वापरताना हे पाणी भरपूर दिवस साठवून ठेवले जात आहे. अशा ठिकाणी टाक्यांमध्ये अळ्या सापडत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी तात्काळ बांधकाम व्यावसायिक व नगरपरिषद कर्मचारी यांची बैठक घेत डास असलेल्या भागात फवारणी करावी तसेच साठवून पाणी ठेवलेल्या टाकीची स्वच्छता सातत्याने करावी, अशा सूचना करीत नगरपरिषद प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे बजावले आहे.