(पुणे)
भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याचे वृद्ध वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले होते. महादेव जाधव सोमवार (२७ मार्च) रोजी सकाळी ११.३० वाजल्यापासून पुण्यातील कोथरुड परिसरातून बेपत्ता होते. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर शेवटी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली. केदार जाधवने सोशल नेटवर्किंग साइट इन्स्टाग्रामवरही ही याबाबत एक पोस्ट शेअर केली असून, त्यात त्याने पत्ता मोबाईल क्रमांकही शेअर केला होता. तर महादेव जाधव यांचा फोटो पुण्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्येही पोहोचवण्यात आला होता
अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेपत्ता महादेव जाधव यांचा शोध सुरू केला. महादेव जाधव यांच्याविषयी कोणाला माहिती असल्यास पुणे शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले होते.
वारजे, कोथरूड, सिंहगड रोड, उत्तमनगर या पोलिस ठाण्यांना महादेव जाधव हे बेपत्ता झाल्याची माहिती कळवण्यात आली. महादेव जाधव हे कोथरूड येथील निवासस्थानातून बाहेर पडल्यावर ते बॅरोमीटर हॉटेलपासून पुढे साने डेअरी, कोथरूड स्टँड (सुतार बसस्थानक) आणि त्यानंतर कर्वे पुतळा या ठिकाणी त्यांचे शेवटचे लोकेशन सीसीटीव्हीद्वारे मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर त्यांचा शोध लागला. रस्ता चुकल्यामुळे ते घरी परत येऊ शकले नाहीत, अशी माहिती मिळत आहे. महादेव जाधव सुखरुप असून त्यांना पोलिसांनी मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये आणले गेले. तेथून जाधव यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आली.