(राजापूर/प्रतिनिधी)
कष्टला वेगवेगळ्या प्रयोगांची जोड दिली तर कोकणच्या या लाल मातीत कोणतही पीक घ्यायचं म्हटलं तर अशक्य अस काहीच नाही. राजापुरातील गोठणे-दोनिवडे येथील प्रयोगशील शेतकरी संतोष राघव यांनी कोकणच्या लाल मातीत बटाट्याचे पीक पिकवून नवा प्रयोग यशस्वी केला आहे. नुसता प्रयोग केला नाही तर त्यातून भरघोस उत्पन्नही घेत आहेत.
कोकणच्या लाल मातीत घाटमाथ्यावरील ऊस, झेंडूची फुल, स्ट्रॉबेरी पिकविण्याची किमया कोकणातील शेतकऱ्यांनी केली आहे. आता तर या लाल मातीत बटाटा पिकविण्याचा एक नवा प्रयोग संतोष राघव यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षापासून ते भाजीपाल्यासह मका, कलिंगड, टॉमेटा, कारले, काकडी, मिरची, झेंडू,वाल, भेंडी, वांगी, काकडी, चवळी, मिरची आदी विविध पिके घेत आहेत.
त्याचवेळी त्यांनी काळा तांदूळ आणि कांदा लागवडीचाही प्रयोग केला आहे. केवळ नोकरीच्या मागे न धावता शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळविता येते याचा एक आदर्श त्यांनी तरूण पिढीसमोर ठेवला आहे.
संतोष राघव या तरूणाचे भारतीय सैन्यामध्ये जाण्याचे स्वप्न होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचे स्वप्न अधुरे राहीले. काही महिने त्यांनी होमगार्ड म्हणूनही काम केले. मात्र शेतीची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यातूनच अर्जुना नदीच्या काठावरील विचारे कुटुंबियांच्या शेतामध्ये विविधांगी पिके घेणारे उत्तरप्रदेशमधील ब्रीजभान आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर, ब्रीजभान यांच्यासह ओणी हायस्कूलचे माजी प्राचार्य शहाजीराव खानविलकर, गोठणे दोनिवडे हायस्कूलचे माजी प्राचार्य सत्यवान कणेरी, बाबाजी विचारे आणि कुटुंबिय यांच्या मार्गदर्शनातून राघव गेली पाच वर्ष सुमारे दोन एकर 28 गुंठे जागेमध्ये विविध प्रकारची शेती करत आहेत. तसेच कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा विक्रीचाही व्यवसाय ते करतात. त्याच्या जोडीला रिक्षा व्यवसायही सांभाळत आहेत.
अर्जुना नदीच्या काठावरील उन्हाळ्यामध्ये पडीक असलेली शेतजमीन भाडेकरारावर घेवून राघव यांनी त्या ठिकाणी सेंद्रीय शेतीचा मळा फुलविला आहे. सुमारे दोन एकर क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या भाजीसह विविध प्रकारची १३ पिके घेताना त्यांनी शेती क्षेत्रातील उत्पादनाचे नवनवीन प्रयोगही केले आहेत.
त्याचवेळी त्यांनी काळा तांदूळ, कांदा लागवडीचाही प्रयोग केला आहे. यावर्षी त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करताना सुमारे दोन गुंठे जागेमध्ये बटाट्याची लागवड केली आहे.
गादी वाफे तयार करून दोन सरींमध्ये सुमारे दोन फुटाचे अंतर असलेल्या चौदा सरी तयार केल्या. त्यामध्ये त्यांनी इंदूर बटाटा या जातीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांना पत्नी सुश्मिता, भाऊ अंकुश यांची साथ लाभत आहे. श्री.राघव यांच्या बटाटा लागवडीच्या प्रयोगातून आता कोकणच्या तांबड्या मातीमध्ये बटाट्याचेही रूजवात होणार आहे. पिकणाऱ्या शेतमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्धततेची फारशी समस्या भेडसावलेली नसल्याचे संतोष सांगतात. सुमारे सहा-सात कि.मी. अंतर कापून राजापूर शहरातील ग्राहकवर्ग थेट शेताच्या बांधावर येवून भाजीपाला आणि अन्य शेतमाल खरेदी करीत असल्याचे ते सांगतात.
तसेच गोठणे दोनिवडे गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थही या ठिकाणी खरेदीसाठी येतात. त्याव्यतिरीक्त गावा-गावामध्ये साजरे केले जाणारे विविध उत्सव, सण, कार्यक्रम, लग्नसमारंभासाठी भाजीपाल्याची आवश्यकता भासत असल्याने यजमान थेट शेतामध्ये येवून त्याची खरेदी करीत असल्याचे ते सांगतात.
दरम्यान जादा उत्पादन आणि उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडून रासायनिक खतांचा जादा मात्रा वा पिकांवर विविधांगी औषधांची फवारणी केली जाते. मात्र, या रासायनिक खतांचा वापर आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरतो. त्यामुळे रासायनिक खताला फाटा देत संतोष राघव यांनी आरोग्याला पोषक ठरणारा सेंद्रीय शेतीचा मळा फुलविला आहे. त्यामुळे संतोष यांच्या मळ्यातील शेतमालाला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. जमिनीची मशागत करताना शेणखताचा जास्त वापर करीत असल्याचे संतोष यांनी सांगितले. संतोष यांनी केलेला हा प्रयोग नक्कीच तरुणासाठी आदर्शवत ठरणार आहे.