(नांदेड)
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त देशभरात अनेक बॅनर लावले आहेत. मात्र नांदेडमध्ये काँग्रेसच नेते अशोक चव्हाण यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय बनला आहे. या बॅनरमध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो आहे. तसेच, त्यासोबत रघुपती राघव राजाराम… असे लिहून अशोक शंकराव चव्हाण असे त्या बॅनरवर लिहण्यात आले आहे. मात्र, त्यावर काँग्रेस किंवा माजी मुख्यमंत्री असा कुठल्याही पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा अनेकांनी केला होता. भाजप नेते गिरीश महाजन यांनी 15 दिवसात राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून लावण्यात येणाऱ्या बॅनरवर कोणत्याही पदाचा उल्लेख केला नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सत्य साईबाबांचे भक्त असलेले चव्हाण देव धर्माच्या बाबतीत फारसे सक्रिय नसतात.
मात्र अयोध्येच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी केलेली बॅनरबाजी राजकारणात उलथापालथ घडवणारी ठरते की काय अशी चर्चा रंगली आहे. बॅनरमध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो आहे. त्यासोबत रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान या महात्मा गांधी यांच्या भजनातील ओळी मजकूर दिसत आहे.