(लांजा)
कुरिअर बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २५) सकाळी ७.४५ वा. लांजा येथे घडली. अक्षय चंद्रकांत माजळकर (वय ३०, मूळ रा. माजळ, माजळकरवाडी, ता. लांजा, सध्या रा. लांजा शेट्येवाडी) हा लांजा येथे ईकॉम एक्स्प्रेस या कुरिअर कंपनीत कुरिअर बॉय म्हणून कामाला होता.
शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अक्षय याच्या छातीत दुखत होते. त्यामुळे त्याची पत्नी अमृता अक्षय माजळकर (वय २५) हिने त्याला लांजा येथील एका खासगी रुग्णालयात सकाळी साडेसात वाजता दाखल केले. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच ७.४५ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. याची खबर त्याचा चुलत भाऊ हिराचंद मनोहर माजळकर (वय ४५) याने पोलिसांना दिली. याबाबत लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.