(रत्नागिरी)
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या अनेक व्यावसायिक समस्या मार्गी लावण्यात कास्ट्राईब शिक्षक संघटना यशस्वी ठरली आहे. संघटनेच्या रितसर सभासदांची 100 टक्के कामे आम्ही आजपर्यंत केली आहे. आता जिल्हा मेळाव्याची जय्यत तयारी करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष, पतपेढीचे माजी चेअरमन प्रदीप वाघोदे यांनी केले आहे.
काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात संघटनेने काम सुरू केले. आता संघटनेमुळे ज्या शिक्षकांच्या व्यावसायिक समस्या सोडवल्या गेल्या तेच शिक्षक आता कास्ट्राईब शिक्षक संघटनेशिवाय पर्याय नसल्याचे जिल्ह्यातील इतर शिक्षकांना सांगू लागले आहे. संघटनेची ही जमेची भुषणावह वाटत असली तरी याचे श्रेय माझ्यासह सर्वच तालुकाध्यक्ष व संबंधित पदाधिकार्यांना जाते. त्यांनी समस्या सोडविण्यासाठी समोर मांडल्या. म्हणून संघटनेच्या जोरावर आपण त्या सोडवू शकलो असेही श्री.प्रदीप वाघोदे म्हणाले.
येत्या काही दिवसात आपण जो जिल्हा मेळावा घेणार आहोत, त्यात जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षकांनी सर्व मतभेद, विचारभेद बाजुला शिक्षकांसाठी लढणार्या कास्ट्राईब शिक्षक संघटनेत सामील व्हावे. कास्ट्राईब शिक्षक संघटना दूरगामी परिणामांचा विचार करून संप पुकारते किंवा संपात सामील होते. ऊठसूठ संप जाहीर करणे आणि मागे घेणे ही संघटनेची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही. संप पुकारायचाच असेल तर तो व्यावसायिक अडचण न ठरता कर्मचार्याच्या हितासाठी बांधील आणि ठाम असला पाहिजे अशी संघटनेची विचारधारा असल्याने आम्ही या पद्धतीने काम करीत आहोत.
आम्ही आमच्या कामात यशस्वी झाल्याची पोहोचपावती आम्हाला वेळोवेळी मिळत आहे. संघटनेेचे सभासदत्व घेण्यास अनेक शिक्षक इच्छुक आहेत यावरून संघटना वाढीस लागल्याचे आता सर्वजण मान्य करू लागले आहे.
छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई, राजर्षि शाहू, संतश्रेष्ठ संत नामदेव, संत बसवेश्वर, संत रोहिदास, संत तुकाराम महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपल्या संघटनेची कार्यपद्धती असल्याचेही त्यांनी यावेळी श्री.वाघोदे यांनी नमूद केेले. जिल्हा पदाधिकार्यांच्या बैठकीत जिल्हा मेळाव्याच्या दृष्टीने काही ठराव करण्यात आले. यावेळी सर्व तालुकाध्यक्ष, सचिव, सल्लागार आदी उपस्थित होते.