(रत्नागिरी/प्रतिनिधी)
विश्वासाला तडा देणारी घटना रत्नागिरी शहरालगतच्या कारवांची येथील बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत घडली आहे. ज्या बँकेने विश्वासाने सोनाराला बँकेसाठी दागिन्यांची पडताळणी करण्यासाठी नेमले त्या सोनारानेच बँकेला 49 लाख 70 हजाराचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी 5 संशयितांविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. त्यानंतर 4 जणांना अटकही केली. मात्र यातील एकजण पळून गेला आहे. याप्रकरणी रश्मी कुजुर (54, शिवाजीनगर रत्नागिरी ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
बँक ऑफ इंडियाला गंडा घालणाऱ्या प्रदीप श्रीपाद सागवेकर (51, कोकणनगर, मुळ निवसर ता़ लांजा), आकाशानी कांबळे (50, कुवारबाव रविंद्रनगर, रत्नागिरी), शुभम कांबळे (24, कुवारबाव रविंद्रनगर, रत्नागिरी) व जयवंत मयेकर (49, पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या 4 संशयितांची नावे आहेत. शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस काठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण संशयित सलीम हुसेन निंबल (रा़ कोकणनगर रत्नागिरी) हा अद्याप फरार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अशा पाच जणांनी मिळून बँकेची ४९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली.
बँक ऑफ इंडीया कारवांचीवाडी शाखेची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारीत रश्मी कुजुर यांनी म्हटले आहे की, बँक ऑफ इंडीया कारवांचीवाडी येथील शाखेत प्रदीप सागवेकर हा सोने पडताळणीसाठी कार्यरत होता. सागवेकर याच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत 21 जानेवारी 2019 ते 23 मार्च 2022 या दरम्यान सागवेकर याने बनावट सोन्याचे दागिने हेच खरे असल्याचे प्रमाणपत्र दिले.