(निवोशी-गुहागर / उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, काजुर्ली नं.२ मानवाडी ची विद्यार्थिनी कु. सोनाली मोहन डिंगणकर हिची “जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान” या जिल्हा परिषद रत्नागिरी ने राबवलेल्या उपक्रमाअंतर्गत इस्रो व नासा निवड चाचणी परीक्षेत जिल्हास्तरावर झालेल्या अंतिम फेरीत यश संपादन करत कु. सोनाली मोहन डिंगणकर हिची नासा (अमेरिका) आणि इस्रो (भारत) या दोन्ही महत्वपूर्ण विज्ञान संस्थांच्या भेटी साठी निवड झाली आहे.
तालुका स्तरावर एकूण तीन विद्यार्थ्यांची निवड करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. त्यात गुहागर तालुक्यामधून कु.सोनाली मोहन डिंगणकर ( शाळा-काजुर्ली नं-२- मानवाडी ) हिची इस्रो व नासा या महत्वपूर्ण विज्ञान संस्थांच्या भेटी साठी निवड झाली तर
कु.क्षितिजा शशिकांत मोरे (शाळा वेळंब नं १) आणि मुस्तफा मुनव्वर शेख (शाळा- कोंड शृंगारी उर्दू) यांची इस्रो साठी निवड करण्यात आली.
सोनाली ही अत्यंत अभ्यासू, मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थीनी असून खेळातही तीची कामगिरी खूप चांगली आहे. सलग तीन वर्षे तीने लंगडी क्रीडा प्रकारात गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व केले असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक -दशरथ साळवी यांनी सांगितले. तिच्या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक- दशरथ रघुनाथ साळवी, सहकारी शिक्षिका- पूनम हर्षद माने तसेच शिक्षक- सुनील सदानंद गुडेकर त्याचप्रमाणे तीचे पालक यांचे फार मोठे योगदान आहे.
शेतकरी, शेतमजूर एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी कु.सोनाली डिंगणकर हिचे वडील मोहन डिंगणकर मुबंईत खाजगी क्षेत्रात काम करतात. तर आई घर व शेतीची कामे सांभाळून आशा प्रकल्पाचे काम पाहतात. कु.सोनालीच्या या निवड यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.