(नवी दिल्ली)
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिलेल्या निवेदनामुळं जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोनाच्या साथीचा प्रभाव दोन वर्षांनंतरही कायम आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोना काळानंतर तरुणांच्या आकस्मिक मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. करोनाशी याचा संबंध आहे का याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती मांडवीय यांनी काल दिली.
सहज चालता-फिरताना किंवा नाचताना हृदयविकाराचा झटका येऊन लोकांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं कोरोना नंतरच्या काळात वाढली आहेत. यात १८ ते ४० वयोगटातील तरुणांचा अधिक समावेश आहे. व्यायामशाळेत वर्कआउट करताना देखील मृत्यू झाल्याची उदाहरणं आहेत. लग्नाच्या हळदी समारंभातही काही मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर मांडवीय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात वरील माहिती दिली.
‘आकस्मिक मृत्यू वाढण्याचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्याचा ठोस पुरावा नाही. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( ICMR ) तर्फे याबाबत वेगवेगळ्या बाजूनं अभ्यास सुरू आहे. कार्डिअॅक अरेस्टच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे, असं मांडवीय म्हणाले.
‘देशातील ४० रुग्णालये आणि संशोधन केंद्रांमध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांच्या आकस्मिक मृत्यूची प्रकरणे तपासली जात आहेत. याशिवाय देशातील ३० कोविड क्लिनिकल रजिस्ट्री हॉस्पिटलमध्ये अशा प्रकरणांवर अभ्यास सुरू आहे. १८ ते ४५ वयोगटातील लोकांवर कोविड प्रतिबंधक लसीचा काही परिणाम झाला आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर व्हर्च्युअल आणि शवविच्छेदनाद्वारे देखील अभ्यास केला जात आहे. कोणताही आजार नसताना होत असलेल्या मृत्यूच्या कारणाचा यातून शोध घेतला जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
हृदयविकाराशी संबंधित आजारांसाठी केंद्र सरकार ‘नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेंशन अँड कंट्रोल ऑफ नॉन कम्युनिकेबल डिसीज’ अंतर्गत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मदत करेल. या कार्यक्रमांतर्गत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, मनुष्यबळाची निर्मिती, आरोग्य संवर्धन, आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत आरोग्य आरोग्य केंद्रांची स्थापना यासारख्या प्रयत्नांचा समावेश आहे. याशिवाय ७२४ जिल्ह्यांमध्ये असंसर्गजन्य रोग चिकित्सालय, २१० जिल्ह्यांमध्ये कार्डियाक केअर युनिट्स आणि ३२६ जिल्ह्यांमध्ये डे केअर सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत, असंही मांडवीय यांनी सांगितलं.