(जे . डी . पराडकर)
लिहिणारे हात चांगले अभिवाचन करु शकतीलच असे नाही . कथेचे अभिवाचन करण्यापूर्वी ती कथा नीट समजून घेतली पाहिजे, शिवाय अभिवाचकाने स्वतःला या कथेतील एक पात्र समजून या कथेत समरस व्हायला हवे . असं घडल्यास कथेचे होणारे अभिवाचन हे ऐकतच रहावे असे होते . आवाज ही परमेश्वराकडून प्राप्त होणारी देणगी आहे . ज्यांच्याकडे उत्तम सोडा मात्र साधारण देखील गळा नाही त्यांनी केलेले कथेचे अभिवाचन वा एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असेल तर , ते रटाळ होवू शकते . वर्गवारीच करायची झाली तर , आम्ही या रटाळ प्रकारात मोडतो . लिहिता हात उत्तम अभिवाचन करु शकेलच असे नाही. अशातच ‘ चपराक ‘ प्रकाशन पुणेचे श्री . घन:श्याम पाटील यांनी माझ्या चपराक प्रकाशन कडून प्रकाशित होणाऱ्या आगामी दोन पुस्तकातील एका पुस्तकात कथेच्या शेवटी एक क्यूआर कोड देण्याचे ठरविले असून हा कोड स्कॅन केल्यानंतर वाचकांना ती कथा ऐकता देखील येणार आहे. चपराकने लाडोबा या त्यांच्या लहान मुलांच्या मासिकात हा प्रयोग यशस्वीपणे केला आणि त्याला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला . कथासंग्रहात अशा प्रकारचा प्रयोग चपराक प्रकाशन प्रथमच करत असून तो मान ” कसबा डायरी आणि डोंगरावरच्या कथा ” या याच महिन्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाला मिळाला आहे , हे मी माझे माझे भाग्य समजतो आणि चपराक प्रकाशनच्या श्री . घन:श्याम पाटील आणि कथेचे वाचन करणाऱ्या सर्व अभिवाचकांना धन्यवाद देतो .
नवोदित लेखकांच्या साहित्यातील वेगळेपण शोधून त्या लेखकांना ओळख प्राप्त करुन देण्याचे काम चपराक प्रकाशन प्रसंगी फायदा – तोट्याचा विचार न करता करत आहे . असे करत असताना चपराकला काही बरे वाईट अनुभव आलेले आहेत . मात्र एखादी बाब व्रत म्हणून स्वीकारली तर , अडचणी आणि अडथळे सांगून काहीच साध्य होत नाही हे लक्षात घेऊन चपराक वाटचाल सुरु आहे . कालनिर्णयचे संचालक श्री . जयेंद्र साळगावकर यांनी माझे लेखन वाचून मला थेट श्री. घन:श्याम पाटील यांच्याकडे पाठवले आणि “साद निसर्गाची” हे चपराक कडून प्रकाशित होणारे पहिले आणि माझे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाचे प्रकाशन श्री . जयेंद्र साळगावकर यांच्याच हस्ते झाले यासारखा दुसरा आनंद तो कोणता ? यानंतर जवळपास सात महिने चपराक जवळ म्हणावा तसा संपर्क नव्हता . या कालावधीत मी काहीनाकाही लेखन करतच होतो . हे सारे लेखन घेऊन मी एप्रिल महिन्यात श्री . घन:श्याम पाटील यांच्याकडे गेलो आणि १५ मे च्या आत बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा तसेच कसबा डायरी अशी दोन पुस्तके प्रकाशित व्हावी अशी इच्छा असल्याचे सांगितले . कोणताही विचार आणि चर्चा न करता श्री . पाटील याला तयार झाले . गेली ३२ वर्षे जरी मी लेखन करत असलो तरीही शहरातील प्रकाशकांच्या दृष्टीने आम्ही नवोदितांतच मोडतो . कागदाचे वाढलेले दर , पुस्तके वाचणाऱ्यांची कमी झालेली संख्या , छपाईचे वाढते खर्च हे सारे मला माहिती असल्याने , मी पाटील यांना प्रथम ५०० – ५०० प्रती छापूया अशी विनंती केली . मात्र माझ्या या प्रस्तावाला नकार देत आपण एक हजारच्या खाली प्रती छापतच नाही असे अगदी ठामपणे सांगितले . दोन्ही पुस्तके उत्तम होणार आहेत , तुम्ही बाकी कोणतीही काळजी करु नका असा उलट धीर नवोदितांच्या यादीत असून चपराकच्या पाटील यांनी मला दिला .
पत्रकारितेतील आमचे मार्गदर्शक शिरीष दामले यांचे अशा बारीकसारीक घडामोडींवर चांगलेच लक्ष असते . त्यांनी फोन करुन मला सांगितले की , चपराकचा कथा ऐकण्यासाठी क्यूआर कोड देण्याचा उपक्रम भन्नाटच आहे असं घन:श्याम पाटीलना सांग . याबरोबरच एखादी कथा तु वाचावीस असं सांगायला दामले विसरले नाहीत . आता प्रश्न असा आला आपल्याच पुस्तकात आपण एखादी कथा वाचतो , हे पाटीलना सांगायचे कसे ? मनात याबाबतचे विचार घोळत असतानाच पाटील यांचाच फोन आला की , एखादी कथा तुमच्या आवाजातील असावी असे मला वाटते . शिरीषने व्यक्त केलेली इच्छा लगेच चपराकच्या पाटीलना कशी कळली ? एखादी इच्छा अंतर्मनापासून व्यक्त केली की , त्याचे अनुभव सकारात्मकच येतात याची प्रचिती मिळवून देणारा हा प्रसंग . मी आजवर कथांचे कधीही अभिवाचन केलेले नाही . नाही म्हणायला आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर एकदा मृदा परिक्षण या विषयावर तीन भागात माहिती सांगितली होती . हाच पहिला अनुभव होता . मृदा परीक्षणची माहिती वाचून दाखवणे आणि कथेचे अभिवाचन करणे यात खूप फरक असल्याने चपराकला कथांचे अभिवाचन करण्यासाठी सहकार्य तर करायचे होते , मात्र स्वतःच्या आवाजात दम नसल्याने याबाबत कोण मदत करु शकेल ? याचा विचार करत असताना , आकाशवाणीवर काम करणाऱ्या आमच्या वहिनीची भावजय जान्हवी भास्कर भागवत आणि भाची कस्तुरी भास्कर भागवत , याबरोबरच ख्यातनाम युवा गायिका निहाली गद्रेची , उत्तम सूत्रसंचालन करणारी आणि सुरेल आवाज असणारी आई दिप्ती अभय गद्रे , विविध कथाकथन स्पर्धेत सातत्याने शाळा महाविद्यालयीन स्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सेजल भार्गव मेस्त्री , प्रांजल प्रमोद गुरव या दोन युवती अशी पाच नाव डोळ्यासमोर आली . या पाचही अभिवाचकां नी आनंदाने कथावाचन करण्याची तयारी दर्शवली .
कथेच्या शेवटी क्यूआर कोड दिल्याने वयस्कर मंडळींना , तसेच वाचल्याने त्रास होतो त्यांना , ज्यांना कमी दिसते अथवा दृष्टीहीन व्यक्तींना , प्रवासात असणाऱ्या मंडळींना , शाळा – महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कथा ऐकवण्यासाठी या क्यूआर कोडचा चांगलाच उपयोग होणार आहे . चपराक वाचकांना केवळ दर्जेदार लेखन असलेली पुस्तके देते असे नव्हे तर , क्यूआर कोड सारखे अभिनव प्रयोग करुन नवनव्या संधी उपलब्ध करुन देत आहे . हे सारे प्रयोग नक्कीच अभिनंदनीय आहेत . मी लिहिलेल्या कथांचे ज्यावेळी मी ऑडिओ ऐकत होतो , त्यावेळी या कथा खरंच मी लिहिल्या आहेत का ? असे मला वाटावे इतका हा प्रयोग मला हृदयस्पर्शी वाटला . चपराकच्या अभिवाचकांनी या कथा एवढ्या उत्तम वाचल्या आहेत की , काहीवेळा कथा ऐकताना नेत्रकडा पाणावतात . मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत चपराक प्रकाशन बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरील कथा तसेच कसबा डायरी ही दोन पुस्तके प्रकाशित करत आहेत . या दोन्ही पुस्तकांना आपण भरभरून प्रतिसाद द्याल असा विश्वास आहे . या पुस्तकांनंतर आणखी तीन पुस्तकांचा मजकूर तयार असून ती पुस्तके देखील यथावकाश वाचकांच्या भेटीला येणार आहेत . आपण वाचताय तोपर्यंतच लिहीण्यात मजा आहे . चपराकचे आणि आमचे भावनिक आणि दृढ विश्वासाचे असे घट्ट नाते तयार झाले आहे . यामुळे मी तरी असे ठरवले आहे की , माझे लेखन चपराक कडूनच प्रकाशित करेन . चपराक जवळ असे विश्वासाचे नाते निर्माण व्हायला ज्यांनी मार्ग दाखवला त्या कालनिर्णयचे संचालक श्री . जयेंद्र साळगावकर यांना तसेच आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले यांना मनापासून धन्यवाद !