(रत्नागिरी)
न्यू इंडिया एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये जाऊन दमदाटी करीत कंपनी संचालकांना धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या संशयिताला ९ वर्षांनी अटक करण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे. नीलेश रवींद्र विचारे ( रा. पालघर ) असे त्याचे नाव आहे. त्याला १० एप्रिल रोजी महाड येथून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ साली न्यू इंडिया एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य मंदिर येथे जाऊन विचारे याने दमदाटी करत तेथील सर्व कर्मचाऱ्यांना बंदिस्त केले होते. कंपनीच्या संचालकाला धमकी दिली होती. तसेच २ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी संचालकांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी २०१२ साली नीलेशला अटक केली होती. त्यानंतर नीलेश न्यायालयात तारखांना हजर राहत नसल्याने न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. त्याचा शोध सुरु असताना गोपनीय माहितीच्या आधारे नीलेश महाड येथे असल्याची माहिती मिळाली. शहर पोलीसानी त्याला १० एप्रिलला महाड येथून ताब्यात घेतले आहे.