सध्या तरुणाईमध्ये आत्महत्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक वेळा शुल्लक कारणावरून लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. पुणे जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आले आहे. यामध्ये एका तरुणाने ऑनलाइन रमीमध्ये 20 हजार गमावले म्हणून नैराश्याच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक खेळांपासून दूर राहून लहान मुले आणि तरुण मोबाइल आणि लॅपटॉपमधील ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहे. या गेमिंगचा वाईट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. पुण्यातील एक तरुण याच गेमिंगच्या जाळ्यात अडकला आणि नैराश्यातून त्याने आपल्या आयुष्यचा शेवट केला.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडेमध्ये ऑनलाइन रमीमध्ये 20 हजार रुपये हरल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश काळदंते असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा कॅबचालक होता. तो स्वतःची गाडी चालवून उदरनिर्वाह करीत होता. परंतु, या व्यतिरिक्त त्याला ऑनलाइन रमी खेळण्याचे व्यसन होते, अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांकडून देण्यात आली आहे.