(गुहागर)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठच्या सहकार्याने उमराठ नवलाई देवीची सहाण सभागृह येथे शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २४ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११ ते साय. ५.०० या वेळेत पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय, शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन या विषयांबाबत तज्ञांमार्फत एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाला सुरूवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.एस.जायभाये, डाॅ. ए.ए. गोरे आणि वरिष्ठ ग्रामस्थ शेतकरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून प्रशिक्षणाचे शुभारंभ/उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रशिक्षकाच्यावतीने सरपंच जनार्दन आंबेकर आणि प्रतिष्ठीत ग्रामस्थ शेतकरी यांचा तर सरपंचानी ग्रामपंचायत उमराठ आणि ग्रामस्थांच्यावतीने प्रमुख मार्गदर्शक आणि सोबत आलेले सहकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सदर प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून पशुधन विकास अधिकारी, डॉ. आर.एस. जायभाये, डॉ. ए. ए. गोरे, पंचायत समिती गुहागरचे डाॅ. आर. एस. खांबल, पशुवैद्यकीय दवाखाना हेदवीचे डॉ. पी.पी.हळदणकर सोबत गुहागरचे परिचर श्री मिसाळ, ड्रेसर श्री सोलकर आणि हेदवीचे ड्रेसर पोवार हे पशुसंवर्धन विभागातर्फे उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणाचे उद्देश व प्रस्तावना डॉ. आर.एस.खांबल यांनी केले. पहिल्या सत्रात डॉ. आर.एस जायभाये यांनी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय या विषयावर तर डॉ. ए.ए. गोरे यांनी दुसऱ्या सत्रात शेळीपालन व परसातील कुक्कुटपालन या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सखोल मार्गदर्शन करताना सदर व्यवसायातील शासकीय विविध योजना, पशू व पक्षी याबाबतीत येणारे साथीचे रोग, त्यावरील उपाययोजना, घ्यायची काळजी, त्यांचे पालन-पोषण, संगोपन, सोयी-सुविधा, फायदे-तोटे, कर्ज व्यवस्था आणि उपलब्ध मार्केटिंग इत्यादी मुद्यांवर सोप्या आणि साध्या पद्धतीने मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना माहीत नसलेल्या अनेक बाबी त्यांनी उदाहरणे देऊन सांगितल्या.
सदर पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचा लाभ सुमारे ४० ग्रामस्थ शेतकर्यांनी घेतला. यामध्ये पुरूषांबरोबर महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रशिक्षणाच्या वेळी पशुसंवर्धन विभागातर्फे जेवणाची सुद्धा उत्तम सोय करण्यात आली होती. हे एक दिवसीय प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे उपसरपंच सुरज घाडे, सदस्या सौ. साधना गावणंग कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, शाईस दवंडे तसेच श्रीकांत कदम, विनायक कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी उपस्थित मार्गदर्शक आणि प्रशिक्षणार्थी ग्रामस्थ शेतकरी यांचे आभार मानून सरपंच जनार्दन आंबेकर यांनी समारोप केला.