(मानसिक संतुलन – भाग १८)
स्वतःस बंधन मुक्त करुन आनंदी जीवन जगणे हे सर्वस्वी आपल्या हातात असते, हे आता आपल्याला हळूहळू लक्षात येत आहे. आपले जीवन आनंदी बनवायचे की दुःखी बनवायचे, हे इतर कुणी नाही, तर आपण ठरवू शकतो. म्हटले तर मुक्त नाही तर गुलाम! मागच्या लेखात मुक्ती दोन प्रकारची असल्याचा उल्लेख आपण केला. त्यातील बाह्य घटकांतून मुक्ती कशी मिळवायची ते आपण पाहिले. आज अंतर्गत घटकांविषयी माहिती घेऊ. हे घटक म्हणजे पतंजलींनी अष्टांग योगात सांगितलेले पाच नियम होत.
आपल्या उन्नतीचे एकमेव साधन म्हणजे आपले शरीर! हे सर्वच कबूल करतात. परंतु ते निरोगी ठेवणारे अगदीच दुर्मिळ! त्याची आवश्यक ती काळजी आपण कधी घेत नाही. आपले शरीर एक अद्भुत यंत्र आहे. अलीबाबाची जणू गुहा! यशोदेला तर कृष्णाच्या मुखात ब्रह्मांड दिसल्याचा उल्लेख आहे. आणि ते खरेच आहे. आपले शरीर म्हणजे ब्रह्मांडाचे जणू लघुरूप होय. म्हणूनच असे म्हणतात की, “ब्रह्मांडाचा अभ्यास करायचा असेल तर पिंडाचा अभ्यास करावा. पूर्वीच्या ऋषी मुनींनी हेच केले. स्वतःवर प्रयोग करून, स्वत:स शोधून विश्वाची अनेक रहस्य उलगडून दाखवली. अशा अद्भूत देहाची अज्ञानाने, अनेक कारणांनी माणूस विटंबना करतो किंवा त्याचा नाश करतो, तेव्हा तो स्वतःचे नाही तर निसर्गाचेही अपरिमित नुकसान करतो. त्या निर्मात्याचा हा घोर अपमान नाही काय?
प्रत्येकास हे माहिती आहे की ह्या जगातील आपली एकमेव प्रॉपर्टी म्हणजे आपले शरीर आहे. ह्या स्थूल देहामुळेच आपले अस्तित्व आहे. त्याच्यामुळेच आपण हे सुंदर जग पाहू शकतो. ते जर बिघडले किंवा नष्ट झाले तर सगळेच संपले. म्हणून त्यास टिकवले पाहिजे. निव्वळ टिकवायचे नाही तर ते उत्तमपणे टिकवायचे आहे. एखादी मौल्यवान वस्तू आपण किती जपतो बरे! ती खराब होऊ नये म्हणून तिची काळजी घेतो. आधुनिक काळातील ती एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर विचारूच नका! तिचे मेक्यानिझमही समजून घेतो. ती कशी चालवायची? ती केव्हा बिघडते? सर्व काही! परंतू गम्मत ही की, आपले शरीर जे आयुष्यात एकदाच मिळते, ते अत्यंत मौल्यवान आहे, त्यास replacement नाही. अशा शरीरास त्या मशिन इतकेही महत्व आपण देऊ नये! केवढे हे आश्चर्य!! आपल्या आयुष्यात शरीराची रचना त्याचे कार्य समजून घेण्याची किती तसदी आपण घेतो? किती रहस्य दडली आहेत ह्या शरीरात? कधीही आपल्याला त्याबाबत उत्सुकता निर्माण होत नाही., हे शरीर म्हणजे नेमके आहे काय? असा विचारही कधी येत नाही. बाह्य वस्तूंबाबत किती उत्सुकता! परंतू ज्याच्या माध्यमातून आपण हे जग पाहतो आहोत ते शरीर कोसळेपर्यंत आपल्याला त्याचे महत्व लक्षात येत नाही. ज्यावेळी व्याधीग्रस्त होऊन ते कोसळते त्यावेळी आपले लक्ष त्याकडे जाते. खरेच हे मोठे दुर्दैव आहे.
आपले शरीर समजण्यासाठी आपल्याला फार काही करावे लागत नाही. फक्त त्याची नीट काळजी घ्यावी लागते. त्याला त्याचे काम करण्यास फक्त मोकळीकता द्यावी बस्स! ती तेव्हाच शक्य होईल ज्यावेळी ते स्वच्छ आणि कार्य तत्पर ठेवले जाईल. शरीराची दुसरी मुक्ती इथे सुरु होते. यासाठी पाच गोष्टींवर नित्य ध्यान द्यावे, असे पतंजली म्हणतात. सर्व प्रथम आपले शरीर स्वच्छ ठेवता यायला हवे. पतंजलींनी त्यास ‘ शौच” हा शब्द वापरला आहे.
_शौच_ चा अर्थ आहे स्वच्छता! कोणती स्वच्छता? शरीर आणि मनाची स्वच्छता!! निव्वळ हात पाय धुतले किंवा आंघोळ केली म्हणजे शरीराची स्वच्छता होत नाही. आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये आहेत. या सर्वांची स्वच्छता करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. योगशास्त्रात त्यांस _षटकर्म_ असे म्हणतात. त्या प्रत्येकाने शिकून घ्यायला हव्यात. नाक, कान, डोळे, जीभ त्वचा ही सर्व ज्ञान देणारी इंद्रिये आहेत. त्यांची नेहमी योग्य पद्धतीने स्वच्छ्ता ठेवायला हवी. म्हणजे त्यातून मिळणारे ज्ञान आपल्याला अधिकाधिक सत्याच्या जवळ नेईल.
शरीरासोबतच मनासही स्वच्छ करण्यास शिकावे. मन कसे स्वच्छ करावे? ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून दिवसभर अनावश्यक अशी माहिती डोक्यात जात असते. मीडियाच्या माध्यमातून हे प्रमाण जरा अधिकच वाढले आहे. संध्याकाळी आपण आपल्या घराची जशी झाडलोट करतो तशीच डोक्यात शिरलेला हा अनावश्यक कचरा काढून टाकावा. अर्थात हे काढून टाकण्याची काही तंत्रे योगशास्त्रात आहेत. ती शिकून घ्यावीत. म्हणजे भविष्यात मानसिक तणाव वाढणार नाही.
_संतोष_ हा दुसरा नियम होय. संतोष ह्या शब्दाचा सरळ अर्थ समाधान हा आहे. आपण नेहमी समाधानी असले पाहिजे. ” _ठेविले अनंते तैसेचि रहावे,_ _चित्ती असू द्यावे समाधान”_ असे संतमंडळी म्हणतात. कशाबद्दल समाधानी असावे? आपले कुटुंब, शेजारी, समाज व देश याबाबत आपण संतुष्ट असायला हवे. परंतु हे कसे शक्य आहे? हे सारे घटक आपल्या मनासारखे असतील कशावरून ? बऱ्याचदा ते नसतातच! जर हे सगळे नीट नसेल तर समाधान कसे मानायचे? असा प्रश्न मनात येत असेल तर ते चूक आहे. असे योगशास्त्र म्हणते. कसे ते पहा…
इथला निसर्ग आपल्या जन्माच्या आधीपासून आहे. आपण त्यात नवीन जन्म घेतला. अशावेळी आपल्याला जे (मनासारखे) हवे आहे ते आधीपासूनच असणे कसे शक्य आहे? मात्र आपल्याला जे हवे ते निर्माण करण्याचे स्वातंत्र्य मात्र ईश्वराने आपणास दिले आहे. जे आहे त्यावर टीका करण्याचा आपल्याला काय अधिकार? जे आहे ते आहे. नवीन हवे असेल तर ते आपण निर्माण करावे. हा सरळ हिशोब! त्यासाठी ईश्वराने तुमच्यात क्षमता दिली आहे. आणि ती नसेल, तर ती आधी निर्माण करावी. आणि मग हवे तसे जगावे. तुम्हाला हवे तसे जगण्यासाठी इतरांनी काय म्हणून कष्ट घ्यावेत? तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवून जगा. ते जगता येत नसेल तर त्यास तुम्हीच जबाबदार नाही का? मुळात ईश्वराने जे आपल्याला दिलेले असते ते पुरेसे असते. त्याचा उपयोग करण्याची बुध्दी व कौशल्य तुमच्याकडे हवे. खूप काही मिळाल्याने आपण खूप काही करू शकतो हा भ्रम आहे. असे कधी होत नाही. तसे असते तर ज्यांच्याकडे सर्व काही आहे ते सुखी असते.
तप ही तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. तपाविना काही शक्य नाही असे म्हटले जाते. काही प्राप्त करायचे असेल तर कष्ट हे घ्यावेच लागतील. परंतु अलीकडे कष्ट कोणी घेत नाही. सारे काही सहज हवे. फुकट मिळाले तर अति उत्तम! कष्ट न करणे किंवा कमी कष्ट करण्याची ही वृत्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्वतःस कमकुवत बनवते. कष्टाशिवाय मिळालेले सुख फार काळ टिकत नाही. कष्टाने मिळालेले यश खूप मौल्यवान असते आणि समाधानही देते. कष्टाने प्रतिकारशक्ती वाढते. अंतर बाह्य निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी एक ताकद आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. कष्टातून बरवाईट अनुभव येतात. ते जीवनाचे खरे शिक्षण आहे. शरीराची सुयोग्य वाढ होण्यासाठी कष्टाची गरज आहे. कष्टातून येणारे अनुभव आपल्याला जीवन खऱ्या अर्थाने जगण्यास मदत करतात. तपाच्या पुढची पायरी म्हणजे स्वाध्याय.
कोणत्याही गोष्टीचा नीट अभ्यास करावा. सर्व दुःखांचे मूळ कारण हे अज्ञान आहे. आपण जी कृती करण्याचे मनात आणले आहे त्याचे परिणाम काय होतील, याचे ज्ञान आपल्याला आधीच असायलाच हवे. अन्यथा नंतर पस्तावण्याची पाळी येते. आपल्या संस्कृतीने आपल्यासाठी मोठी ग्रंथसंपदा बहाल केली आहे. पुरातन धर्मग्रंथांतून ऋषीमुनींनी जीवन कसे जगावे व आपला उद्धार कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले आहे. अनेक विचारवंतांनीही त्यांच्या पुस्तकांतून जीवन विषयक मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. जीवन कसे जगावे हे सांगणारे ग्रंथ, पुस्तके आपण नियमित वाचायला हवीत. पुढच्याच ठेच मागचा शहाणा या नात्याने अशा प्रकारचे वाचन आपल्याला पुढे जगण्यास खूप उपयोगी ठरते. काही ज्ञान आपल्या अनुभवातून मिळते. त्यासाठी प्रत्यक्ष साधनाही करावी. नियमित मनन आणि चिंतन करावे. दिवसातील काही वेळ आपण अंतरमुखतेसाठी (ध्यानासाठी) द्यायला हवा. जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात.त्या अनुभवातून आपण शाहाणे व्हायचे असते. स्वाध्यायाने स्वतःला चांगली जाण येते. स्वतःचा अभ्यास करता येतो. बाहेरील जगताचा मर्यादित अभ्यास करून अधिकाधिक वेळ अंतर जगताचा अभ्यास करण्यात घालवावा. स्वतःला ओळखल्याशिवाय बाह्य घटकांचा नीट उपयोग करता येणार नाही. एखाद्या सैनिकाला खू7प काही हत्यारे दिली परंतु ती चालवायची कशी याचे प्रशिक्षण नसेल तर त्या हत्यारांचा कसा उपयोग करायचा हे त्यास कसे समजणार? त्यामुळे कदाचित त्या हत्यारांपासून तो स्वतःचेच नुकसान करून घेईल. हे जग समजून घ्यायचे असेल तर आधी आपण स्वतःला समजून घेतले पाहिजे. आपल्या शरीराची व मनाची क्षमता आजमावली पाहिजे. हे जग तटस्थ आहे त्यात ना काही बदल करता येत ना काही नष्ट करता येत. ते जसे आहे तसेच आहे. पुढेही तसेच राहणार आहे. त्याची चिंता करण्याचे कारण नाही. ह्या जगातून आपल्याला आपल्या उन्नतीसाठी काय हवे येवढाच विचार करावा. बाकी त्या निर्मात्यावर सोडून द्यावे. या पाचवा नियम _ईश्वरप्रणिधान_ होय.
_ईश्वरप्रणिधान_ हा पाचवा नियम आहे. आपल्याला जे चांगले वाटते ते करीत रहावे. आपल्या उन्नतीसाठी जे योग्य वाटते ते करावे. त्यात बरे काय आणि वाईट काय याचा विचार फारसा करू नये. आपल्याला जे स्फुरते ते काही कारणासाठीच स्फुरते. त्यात आपला काही दोष नसतो. ते का स्फुरते तो वेगळा अभ्यास आहे. सवड मिळाल्यास तोही करावा.
एखादी गोष्ट नाही जमली तर मनास वाईट वाटून घेऊ नये किंवा एखादी गोष्ट खूपच चांगली जमली तर शेफारून जाऊ नये. करता करविता तो ईश्वर आहे. त्याच्या इच्छेने सगळं काही होत असते. असा मनी विश्वास ठेवावा. एखाद्या लहान बाळाची सर्व चिंता त्याची आई वाहते. अगदी तसेच लहान मुलासारखे होऊन या जीवनाचा आनंद घ्यावा. या जगात फारसे रमू नये. फार काही गुंतवणूक करू नये जेणेकरून आपल्याला अखेरला ती सोडवण्यासाठी त्रास होईल. काही काळासाठी आपला इथे मुक्काम आहे, हे नेहमी ध्यानात ठेवून कर्म करीत राहावे. अशाने मानसिक तणाव येत नाही. जे घडले ते चांगलेच घडले, ते आपल्या हितासाठी घडले अशी नेहमी आपली समजूत करून घ्यावी. हे असेच घडायला हवे, ते तसेच घडायला हवे, ते का घडले, हे का घडले, हे सर्व प्रश्न निरर्थक आहेत. निसर्गाच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही. हे लक्षात आले की नम्रपणा येऊ लागतो. शरीर व मनात शिथिलता (Relaxation) येते. परिणामी बाह्य घटकांमुळे मन तणावग्रस्त होत नाही. पुढच्या वाटचालीसाठी ते मोकळे होते.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413