( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका चालकांना सप्टेंबर महिन्याचे थकीत मानधन व दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत ठेकेदाराची चालकांनी भेट घेतली असता त्याने जिल्हा परिषदेने अनुदान दिलेले नसल्याने मानधन मिळणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.
विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांवर गेली १० ते १२ वर्षे कंत्राटी वाहनचालक म्हणून काम करणारे हे कर्मचारी रुग्णांची अहोरात्र सेवा बजावत आहेत. आरोग्य विभागाने चालकांची कायमस्वरूपी भरती न करता जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाहन चालकांसाठी ठेकेदाराला कंत्राट दिले. स्थायी समितीच्या तसेच सर्वसाधारण सभेतही अनेकदा जोरदार चर्चा झाली तरीही या चालकांना वेळेवर मानधन दिले जात नाही. त्याचबरोबर त्यांना सणासुदीतही मानधनापासून वंचित राहावे लागते.
दिवाळी काही दिवसांवर आलेली असताना त्यांचे सप्टेंबर महिन्याचे मानधन ऑक्टोबरचा पंधरवडा उलटला तरी मिळालेले नाही. त्यामुळे कंत्राटी वाहनचालकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. वेळेवर मानधनाची अपेक्षा आहे.
या चालकांनी आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी चालकांनी दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे मानधन मिळावे,अशी मागणी केली.