रायगड :
लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. हा किल्ला महाडपासून ईशान्येस १६ मैल आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्याने आहे. सह्याद्रीच्या माथ्यावरील बोराट्याची चाळ म्हणजेच दोन डोंगरामधील अरुंद पाय वाट चढणे अतिशय कठीण आहे. हा ३१०० फूट उंचीचा लिंगाणा “आम्ही सह्याद्रीचे वेडे” कोल्हापूर ग्रुपने सर केला. आणि तिथे भगवा ध्वज फडकवत उराशी बाळगलेल लिंगाणा सर करण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालं. लिंगाणा मोहीम फत्ते झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
ते म्हणतात, लिंंगाणा म्हणजे काळजात धडकी भरवणारा सह्याद्रीच्या रांगेतील एक सुळका आहे. पण आमच्या साठी हा लिंंगाणा म्हणजे पृथ्वीच्या उदरातील तप्त ज्वालामुखीच्या उद्रेखातुन शिवलिंगाच्या आकाराचे तयार झालेले एक आव्हानात्मक शिखर होते. हे शिखर कोणत्याही परिस्थिती पार करणे आमच्यासाठी आव्हान होते. “किल्ले लिंगाणा‘’ याला गवसणी घालायचं म्हणजे येरागबाळ्याच काम नाही. याला जिद्दीचा, कसलेल्या हाडामासाचा जातीवंतच पाहिजे. लिंगाणा म्हणजे स्वराज्याचं कारागृह. येथेच कैदीला काळ्यापाण्याची शिक्षा होत असे.
येथे जायचे कसे यासाठी आम्ही बोराट्याची नाळ युट्युबला पहिली होती. आणि एकलीसुद्धा होती. ही नाळ चालत जायला खूप अवघड आहे, पण त्या तेथून प्रवास करताना, तो थ्रिल अनुभवताना वेगळीच अनुभूती येते. तेथील घसरगुंडी आणि डोंगराच्या कड्या कपारीतून जाताना दमछाक होते. दोराच्या सहाय्याने इथे जावे लागते. हा सुळका सर करायला जवळपास 3-4 तास लागतात. डोंगर कपारीतून जायचं साधं काम नाही प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं.
या अविस्मरणीय लिंगाणाची उंची 3100 फूट आहे तो सर करण्यासाठी आम्हाला धनंजय दादा आणि सोमनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. लिंगाणा वरून समोर दिसणारा दुर्गदुर्गेश्वर रायगडला केलेला तो मनाचा मुजरा हा कायम आमच्या लक्षात राहील तसेच हा थरारक अनुभवताना व परत असेच नवीन काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देणारा हा प्रवास होता.