रत्नागिरी : सातत्याने होणाऱ्या आतिवृष्टीमुळे रत्नगिरी शहरातील रस्त्यांची दैना उडाली आहे. नळपाणी योजनेसाठी रस्त्यांची सर्वत्र झालेल्या खोदाईमुळे रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. आम्हाला रस्ते गुळगुळीत नको, पण पावसाळयात टिकू शकतील इतपत रस्त्यांची कामे होणे अपेक्षित होते. परंतु, रत्नगिरी नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यानेच रत्नगिरी शहरातील अवस्था भयावह बनली आहे, अशी प्रतिक्रिया आता सर्वसामान्य जनतेत उमटू लागल्या आहेत. स्वच्छ व सुंदर रत्नगिरीची वाटचाल चिखलमय रत्नगिरीकडे होत असल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत आहे
बहुचर्चित रत्नगिरी शहरातील नळपाणी योजनेतील कामात झालेली दिरंगाई आणि त्यातच पावसाळयाच्या तोंडावर मोठया प्रमाणात झालेली खोदाई यामुळे रत्नगिरी शहरातील रस्त्याची दुर्दशा पावसाळयात झाली आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पावसाळयाआधी करण्यात यावी, अशी सातत्याने मागणी रत्नगिरीकरांकडून होत होती. परंतु, आपल्याच मस्तीत असणाऱ्या सत्ताधाऱ्यानी पावसाळयाआधी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे सोयीस्कररित्या टाळले. परिणामी, पहिल्या पावसातच शहरातील रस्त्यांची अवस्था भयावह झाली आहे.
शहरात काहीठिकाणी डांबरीकरणाची कामे करण्यात आली. परंतु, ही कामेदेखील अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गेले काही दिवस सुरू असणाऱ्या आतिवृष्टीने डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरही खडडे पडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे डांबरीकरण कामाच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त होत आहेत. भरपावसात पाणी योजनेचे सुरू असणारी कामे, त्यातच पावसाळयाआधी नालेसफाईची न झालेली कामे या विविध कारणांमुळे शहरात रस्त्या-रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पाणी योजनेसाठी पाडण्यात आलेले चर केवळ डबराने बुजवण्यात आल्याने त्यठिकाणी चिखलांचे साम्राज्य निर्माण झाले असून, स्वच्छ व सुंदर रत्नगिरीची वाटचाल आता चिखलमय रत्नगिरीकडे होताना दिसत आहे.
रत्नगिरी नगर परिषदेतील सत्ताधाऱ्याच्या बेफिकीरीचा फटका रत्नगिरीकरांना बसू लागला आहे. आम्हाला चकचकीत, गुळगुळीत डांबरीकरण असणारे रस्ते नको, पण पावसाळयात टिकू शकणारे रस्ते बनवणे अपेक्षित असताना नगर परिषद प्रशासनाकडून रस्ते दुरूस्तीचा विषय गांभिर्याने घेण्यात आलेला नाही, असा आक्षेप रत्नगिरीकरांकडून घेतला जात आहे.