(गुहागर)
गुहागर तालुक्यातील नेहमीच वेगवेगळे उपक्रम, योजना राबविण्यात, अनिष्ट कालबाह्य रूढी-परंपरा यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी धाडसी निर्णय घेण्यात सदैव अग्रेसर असणारी ग्रामपंचायत उमराठने आईवडिलांना सांभाळत नाही, तर ग्रामपंचायतीत वारसनोंद होणार नाही असा आणखी एका धाडसी निर्णयाचा ठराव शुक्रवार दि. १३.१०.२०२३ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत सर्वांनुमते टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला.
सदरची विशेष ग्रामसभा ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११५ ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. तत्पूर्वी गुरूवार दि. १२.१०.२०२३ रोजी अनिल अवेरे सर, स्वयंसेवक शिक्षिका प्राची पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम तसेच पालकवर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत बालसभा घेऊन विद्यार्थींशी संवाद साधून विद्यार्थींच्या अडी-अडचणी व सुचना जाणून घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुचनांचे निवारण करण्यासाठी जरूर प्रयत्न केले जातील असे आश्वासन सरपंच जनार्दन आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना दिले.
दि. १३.१०.२०२३ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेच्या पुर्वी महिलांची सभा घेऊन महिलांच्या अडी-अडचणी, समस्या व सुचना जाणून घेण्यात आल्या. त्या नंतर विशेष ग्रामसभेत ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे भाऊ यांनी आगामी वर्षांच्या आराखडा थीमचे वाचन करून ग्रामस्थांना थीम समजावून सांगितली आणि त्यावर चर्चा करण्यात आली.
त्या नंतर ग्रामस्थांकडून आलेल्या सुचनेनुसार सरपंच जनार्दन आंबेकर यांनी विशेष ग्रामसभेत विषय मांडला की, जो मुलगा /अगर मुले आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत, औषधोपचार करण्यात हेडसाळ करतात, म्हातारपणी वृद्धाश्रमात रवानगी केली जाते. अशा परिस्थितीत त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी /शेजारच्या लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार दाखल केल्यास त्या मुलांना (मुले /मुलींना) आईवडिलांच्या नावावरील संपत्तीचे वारस होता येणार नाही, असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी ठराव संमत करण्याची आवश्यकता आहे. यामुळे आईवडिलांकडे म्हातारपणी दुर्लक्ष करणाऱ्या मुलांच्या कृतीला आळा बसेल. तसेच जी मुले /मुली आईवडिलांना व्यवस्थित सांभाळतात त्यांनाच वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वारस म्हणून हक्क मिळतील तशी वारसनोंद केली जाईल. या विषयावर चर्चा होऊन एक धाडसी निर्णयाचा ठराव सर्वानुमते एकमताने टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला.
याबाबत महसूल व ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी यांना सुद्धा या ठरावाची प्रत पाठवून देण्याचे ठरले आहे. ग्रामपंचायतीकडून माहिती घेऊनच वारस प्रकरणे मंजूर करावीत. जी मुले आईवडिलांना सांभाळत नसतील त्यांना शासकीय सुविधांचा लाभ देऊ नये असेही ठरविण्यात आले.
शिवाय आपली वडिलोपार्जित जागा कुणीही विकू नये. अगदीच तातडीची गरज नसेल तर केवल पैशांच्या लोभापायी परप्रांतीयांना विकू नये, अशा आणखी एका धाडसी निर्णयाचा ठराव सर्वांनुमते एकमताने संमत करण्यात आला. तसेच आपली एकादी जागा विकलीच तर मात्र १० फूट रूंदीचा रस्ता आपल्या पुढच्या जागा मालकाला सोडणे बंधनकारक असावे, असा तिसरा ठराव सुद्धा सर्वांनुमते टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला.
सदर विशेष ग्रामसभेला उपसरपंच सुरज घाडे, महिला सदस्या व सदस्य शशिकांत आंबेकर, विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा गोरिवले, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, वसंत कदम, पोलीस पाटील वासंती आंबेकर, शैलेश सैतवडेकर सर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, सर्व वाडी प्रमुख, पदाधिकारी तसेच बहुसंख्य स्त्री-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. सदर सभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, शाईस दवंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मनमोकळ्यापणे चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभार मानून घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन समारोप केला.