देवरूख / प्रतिनिधी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा येथे ट्रक सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला. या भीषण अपघातातून ट्रकचालक बालंबाल बचावला आहे. तो जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धिरज जगन्नाथ गाडेकर (वय-३३, रा. करवीर, जि. कोल्हापुर) असे या भीषण अपघातात जखमी झालेल्या आणि बालंबाल बचावलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. धिरज आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये साखरेची पोती भरून हा ट्रक कोल्हापूरहून जयगडकडे घेवून येत होता. ट्रक कळकदरा येथे आला असता ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत जावून कोसळला. याचवेळी ट्रकचालक धिरज याने जीव वाचवण्यासाठी ट्रकबाहेर उडी मारली. उडी मारल्याने तो गडगडत खाली गेला. मात्र दरीत झाडे असल्याने एका ठिकाणी त्याला झाडाचा आधार मिळाला. मात्र या अपघातात तो जखमी झाला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पो. काँ. तानाजी पाटील यांनी होमगार्ड मंगेश शिंदे यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरीत अडकलेल्या चालक धिरज गाडेकर याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इतर वाहनचालकांना मदतीला घेवून दोरीच्या सहाय्याने जखमी धिरजला दरीबाहेर काढण्यात आले. व अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. तपास हे. काँ. राहूल गायकवाड करीत आहेत.